रत्नागिरी : सातत्याने टीकेचे धनी होत असलेल्या महावितरण कंपनीने विक्रमी वेळेत रत्नागिरी शहराच्या सर्व भागातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. चक्रीवादळानंतर केवळ ६८ तासांत शहराचे सर्व भाग प्रकाशले आहेत.
तौक्ते वादळाने रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करून चांगलाच प्रभाव दाखविला. जोरदार वारा आणि पावसामुळे जागोजागी झाडे आणि तसेच विद्युत खांब पडून रत्नागिरीमधील वीजपुरवठा दिनांक १६ मे रोजी बंद पडला होता. महावितरणची तयारी पूर्ण असली तरी पाऊस, वारा थांबल्याशिवाय काम सुरू करणे आणि वीजपुरवठा सुरू करणे म्हणजे नवीन संकटांना आमंत्रण होते. रत्नागिरी शहर हे जिल्हा मुख्यालय तसेच विविध ठिकाणी हॉस्पिटल्स असलेले महत्त्वाचे शहर आहे. येथील वीज पुरवठा सुरळीत ठेवणे निकडीचे होते. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर आणि कार्यकारी अभियंता रामलिंग बेले यांनी वेगवगळी पथके करून कामाचे नियोजन केले हाेते.
१६ मे रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच पडझडीचे अहवाल मिळणे सुरू झाले. रत्नागिरी शहरातील विविध हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांवर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन असे उपचार सुरू असल्याने सिव्हिल, महिला आणि अन्य कोविड हॉस्पिटलमधील वीजपुरवठा प्रथम सुरू करायचा यासाठी सर्वप्रथम नाचणे, शिरगाव आणि रहाटागर ही उपकेंद्रे पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले. यासाठी कार्यकारी अभियंता बेले व शहर अभियंता ओंकार डांगे यांनी ११० केव्ही वाहिनीची कुवारबाव उपकेंद्रापर्यंत पाहणी केली. यावेळी एमआयडीसी भागात झाडे पडल्याने मेन लाईन बंद पडल्याचे दिसून आले. झाड बाजूला केले, त्यावेळी तो खांब असुरक्षित झालेला आढळला. तो दुरुस्त होण्याला वेळ लागेल म्हणून अन्य मार्गाने वीजपुरवठा वळवून नाचणे, शिरगाव व रहटागर ही उपकेंद्रे सुरू करण्यात साधारण साडेनऊ वाजता यश मिळाले.
संततधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे नीट काम करणे शक्य होत नव्हते. या परिस्थितीवर मात करत रत्नागिरी शहर अभियंता डांगे, त्यांचे सहकारी अभियंते मोडक, वासावे, भंडारे आणि गणेश पक्वान्ने यांच्या मदतीने सिव्हिल हॉस्पिटल, महिला रुग्णालय परकार व अपेक्स या रुग्णालयांत रात्री साडेदहा-अकरा वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश आले. काळोख आणि वाढत्या पावसामुळे नाईलाजाने रात्री एक वाजता काम थांबवावे लागले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पूर्ण तयारीनिशी महावितरणचे कामगार आणि अभियंते मंडळी पुन्हा जोराने कामाला लागली.
दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवांच्या वीज पुरवठ्याला प्राधान्य देण्यात आले. रत्नागिरी शहर पोलीस स्थानक तसेच पोलीस मुख्यालयानजीक झाड पडून खांब नादुरुस्त झाले. तेथे नवे खांब उभे करणे आवश्यक होते. यामुळे खड्डे मारणे व खांब उभे करण्यासाठी ठेकेदार संस्थेची मदत घेण्यात आली. १७ तारखेला रात्री तीन वाजेपर्यंत काम सुरू होते. १८ तारखेला पुन्हा वासावे यांच्याकडील १५ वीज कामगार, अभियंता मोडक यांच्याकडील १५ वीज कामगार, रोहित भंडारी यांच्याकडील पंधरा वीज कामगार शिरगाव उपकेंद्राकडील १० वीज कामगार, तर एमआयडीसी भागात १५ वीज कामगार कामाला लागले. स्थानिक ठेकेदार संस्थांचे साहाय्य या सर्व वीज कामगारांना उपलब्ध करून दिले गेले. १८ तारखेला पहाटे दोनपर्यंत शहरातील विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरू होऊ शकला नव्हता. मात्र, १९ रोजी ठरलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वैयक्तिक वीज तक्रार म्हणजे ज्या ठिकाणी फ्युज गेला आहे किंवा घराजवळील सर्व्हिस वायर तुटली आहे अशा ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे यासाठी सर्व अभियंते आणि वीज कामगार सकाळी साडेसात वाजता हजर झाले. दुपारपर्यंत या तक्रारींचाही निपटारा मोठ्या प्रमाणात करण्यात आला. विक्रमी केवळ ६८ तासांच्या अवधीत रत्नागिरीतील वीज अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, मुख्य अभियंता श्देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भाग प्रकाशमान केला.