चिपळूण : शहरानजीकच्या कापसाळ डिगेवाडी परिसरातील विजेचा दाब कमीजास्त होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले होते. महावितरण कंपनीकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याने अखेर वीजपुरवठा आता सुरळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
भक्तांना करमेना
देवरूख : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील पाच दिवसांच्या तसेच अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. गणेशोत्सवादरम्यान गजबजलेले घर आता बाप्पा आपल्या गावी गेल्याने शांत झाले आहे. दरदिवशीचा अगरबत्ती - धुपाचा सुगंधही थांबला आहे. त्यामुळे भक्तांना आता करमेनासे झाले आहे.
मोकाट गाढवे
खेड : शहरात सध्या मोकाट गाढवांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शहरात सध्या मोकाट फिरणारी जनावरे, गाढवे, श्वान यामुळे नागरिकांना त्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे त्यांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
अवैध गुटखा विक्री
आवाशी : शासनाकडून गुटखा, जुगार यांना कायद्याने बंदी घातली असली तरीही शहरासह ग्रामीण भागात गुटख्याची अवैध विक्री सुरूच आहे. खेड बसस्थानक आवार, सार्वजनिक सुलभ शाैचालय तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी गुटख्यांची पाकिटे पडलेली दिसतात. तरुण अजूनही गुटख्याच्या आहारी जात आहेत.
ऑनलाइन प्रशिक्षण
रत्नागिरी : जिल्ह्यातील गाैण खनिज परवानाधारक, लिलाव, खाणपट्टाधारकांना २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत महाखनिज या ऑनलाइन प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाखनिज संगणक प्रणालीचा वापर कसा करावा, याविषयी माहिती या प्रशिक्षणादरम्यान देण्यात येणार आहे.