चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील कळंबुशी येथील एका तरुणाला संशयित आरोपी म्हणून चिपळुणातील पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील डीबीजे महाविद्यालय परिसरात हा तरुण संशयास्पदरीत्या फिरत हाेता. त्याच्याकडून काही वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. राकेश रमेश चव्हाण (वय ३६, रा. कळंबुशी - खाचरवाडी, ता. संगमेश्वर) असे या तरुणाचे नाव असून, संगमेश्वरातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
सध्या शहर व परिसरात चोऱ्या, घरफोड्या सातत्याने होत आहेत. आठ दिवसांपूर्वी शहरातील चार ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली होती. या घरफोडीत रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांची बैठक घेऊन गुन्ह्यांचा आढावा घेत काही मार्गदर्शनपर सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे शहरात गस्त घातली जात आहे.
येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, पोलीस हवालदार सागर साळवी, विजय आंबेकर, पोलीस नाईक उत्तम सासवे, चालक भास्कर धोंडगा हे शुक्रवारी शहर परिसरात गस्त करीत असताना सायंकाळी ५ वाजता डीबीजे महाविद्यालयासमोरील रस्त्यावर राकेश चव्हाण संयशितरीत्या फिरत हाेता. त्याने २० सप्टेंबर रोजी बुरंबाड, ता. संगमेश्वर येथे एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे आणि त्यावेळी वापरलेली दुचाकी शृंगारतळी, गुहागर येथून चोरी केल्याचे सांगितले, तसेच त्याच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली असता, रोख रक्कम, दोन मोबाईल व अन्य साहित्य असे एकूण २२ हजार २७० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. यामध्ये दोन मोबाईलपैकी सॅमसंग कंपनीचा ए -२० मॉडेल कंपनीच्या मोबाईलबाबत तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे पोलीस नाईक उत्तम सासवे यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. राकेश रमेश चव्हाण यास चिपळूण न्यायालयात हजर केले असता, त्यास वैयक्तिक जामिनावर मुक्त करण्यात आले. त्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाबाबत संगमेश्वर पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यात अटक करून २६ सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.