राजापूर : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी मर्यादित रत्नागिरी संस्थेच्या उपाध्यक्षपदी संचालक प्रकाश पाध्ये यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रथमच या पतपेढीवर प्राथमिक शिक्षकांच्या सात घटक संघटनांनी एकत्र येत तयार झालेल्या महायुतीचे संचालक मंडळ कार्यरत आहे.
महायुतीच्या पूर्वनियोजनाप्रमाणे रिक्त उपाध्यक्षपदासाठी नुकतीच निवडणूक झाली. यात राजापुरातील जिल्हा सर्वसाधारण जागेवर निवडून आलेले प्रकाश गजानन पाध्ये यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. प्रकाश पाध्ये हे मौजे ओझर (ता. राजापूर)चे सुपुत्र असून, सध्या ते जिल्हा परिषद केंद्र शाळा ओझर नं. १ येथे उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. शिक्षक पतसंस्थेत नव्याने निर्माण केलेल्या राखीव जिल्हा सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी दिली. मोठ्या मताधिक्याने ते विजयी झाले हाेते.
पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत पावसकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या समारंभात प्रकाश पाध्ये यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संचालक शांताराम पवार, माजी अध्यक्ष रमाकांत शिगवण, सल्लागार विकास नलावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक सल्लागार बबन बांडागळे यांनी सभागृहाला संबोधित केले. यावेळी नूतन तज्ज्ञ संचालक सु. रा. पवार यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत सकपाळ यांनी केले. आभार रूपेश जाधव यांनी मानले. सूत्रसंचलन रमेश गोताड यांनी केले. या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश सावंत, मंदार सप्रे उपस्थित हाेते.