राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी केळवली गणाच्या सदस्या प्रमिला कानडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केळवली पंचायत समिती गणाला सभापतीपद भूषविण्याचा बहुमान प्रथमच मिळाला आहे. आता उपसभापतीपदाचीही निवड लवकरच अपेक्षित आहे.यापूर्वीच्या सभापती विशाखा लाड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता असून, बारापैकी दहा सदस्य सेनेचे आहेत. सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून, त्याची सव्वा वर्षे पार पडली आहेत. उर्वरित कालावधीसाठी त्याच प्रवर्गात सभापतीपद आरक्षित राहणार आहे. मात्र, शिवसेनेकडे असलेली सदस्य संख्या लक्षात घेता सभापती व उपसभापतीपदासाठी सर्वांना समान संधी देण्याचे धोरण ठरविण्यात आले.त्यामुळे सभापती पदासह उपसभापती पदाचा कार्यकाळ सव्वा वर्षाऐवजी ९ महिन्यांचा करण्यात आला. त्यामध्ये पहिली संधी विशाखा लाड यांना देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ संपताच केळवलीच्या प्रमिला कानडे व कोंड्येतर्फे सौंदळच्या करुणा कदम यांच्यात सभापतीपदासाठी चुरस होती. मात्र, कानडे यांच्या ज्येष्ठतेचा विचार करून त्यांना ही संधी दिली आहे.
प्रमिला कानडे यांची बिनविरोध निवड झाली. आजवर सभापतीपदापासून वंचित राहिलेल्या केळवली पंचायत समिती गणाला कानडेंच्या रुपात प्रथमच बहुमान मिळाला आहे. यापूर्वी केळवली गणाला दोन वेळा उपसभापतीपद भूषविता आले आहे. त्यामध्ये भाग्यश्री लाड व विजय राठोड यांचा सामावेश होता. त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला असून, यावेळी आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, प्रभारी सभापती प्रकाश गुरव उपस्थित होते.