गुहागर : श्वास आणि प्राणांचे घनिष्ठ संबंध आहेत. जोपर्यंत सजीवाचा श्वास चालू आहे, तोपर्यंत त्याच्या देहामध्ये प्राण आहेत. अशा प्राणरुपी श्वासाने देहातील इंद्रियांना कार्यक्षम ठेवणे आणि योग साधनेने शरीर बळकट बनवणे आवश्यक आहे. नियमित प्राणायाम आणि योगसाधना ही निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन पतंजली योगपीठाचे योगगुरु सतीश दळवी यांनी दुर्गादेवी देवस्थान फंड आयोजित योग शिबिराच्या सांगता कार्यक्रमप्रसंगी केले. १२ मार्चपासून या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेले सात दिवस दोन सत्रांमध्ये हे योग अभ्यास शिबिर घेतले जात होते. लहान मुुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी भेटवस्तू, शाल व श्रीफळ देऊन दळवी यांचा गौरव करण्यात आला. देवस्थानेचे उपाध्यक्ष गणेश भिडे आणि माजी उपाध्यक्ष गोंविद दीक्षित यावेळी उपस्थित होते. यावेळी दळवी म्हणाले, दिलेल्या नियमांचे आणि विचारांचे पालन केल्याने प्राणायाम आणि योगांचा फायदा होतो. प्राणायाम नियमित करणे गरजेचे आहे. आज पतंजली योगपीठाच्या माध्यमातून स्वदेशी जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती होत आहे. यामध्ये रसायनमिश्रीत कोणतीही वस्तू आढळणार नाही. स्वदेशी वस्तूंची मोहीम आपण सर्वांनी मिळवून राबवली पाहिजे. सात दिवसांच्या या शिबिरानंतर गुहागरमध्ये सर्वांनी एकत्र येऊन हे योगवर्ग शिबिर अविरत चालवण्याचे निश्चित केले. योगसाधना आणि प्राणायाम केल्यास शरीर तंदुरूस्त राहाते. या कार्यासाठी आपण स्वत:ला वाहून घेतले असून, कोणतीही अडचण असल्यास माझ्याकडून तुम्हाला मार्गदर्शन लाभेल. योगाभ्यास हा खरोखरच जीवनासाठी लाभदायी आहे, त्यामुळे त्याचा अंगिकार करावा, असे ते म्हणाले. (वार्ताहर)
प्राणायाम आयुष्याची गुरुकिल्ली : दळवी
By admin | Published: March 22, 2015 11:10 PM