राजापूर : ऐन शिगमोत्सवात प्रकटलेल्या राजापूरच्या गंगाक्षेत्री भाविकांची गर्दी वाढत आहे. गंगास्नानाची पर्वणी साधण्यासाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यातून भाविक याठिकाणी हजेरी लावत आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसाद खांडेकर यांनी सहकुटुंब गंगास्नान करत गंगामाईचे दर्शन घेतले. गत आठवड्यात ज्येष्ठ मराठी साहित्यिक व प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी सहकुटुंब गंगास्नानाचा लाभ घेतला होता.
राजापूरच्या गंगामाईची ख्याती अनादी काळापासून सर्वदूर पसरलेली आहे. दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या राजापूरच्या गंगेवर ऐतिहासिक काळातही अनेक राजे, साहित्यिक यांनी भेटी दिल्याच्या नोंदी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनीही राजापूरच्या गंगेवर येत गंगास्नान केल्याच्या नोंदी आहेत. या वर्षी राजापूरच्या गंगेचे होळी पौर्णिमा दिवशीच आगमन झाले. त्यानंतर राज्याच्या कोनाकोपऱ्यातील भाविकांनी गंगाक्षेत्री भेट देऊन स्नानाची पर्वणी साधली.गत आठवड्यात प्रसिद्ध कवी अशाेक नायगावकर यांनी गंगाक्षेत्राला सहकुटुुंब भेट देत गंगास्नानाचा लाभ घेतला. त्यानंतर त्यांनी गंगामाईचे दर्शनही घेतले. रविवारी प्रसाद खांडेकर यांनी आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाचा यांच्यासह राजापूरच्या गंगेवर येत गंगास्नान केले. शालेय परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी सुटीत याठिकाणी भाविकांची गर्दी अजून वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.