चिपळूण : तालुक्यात काँग्रेस पक्षाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आपले सदस्य नाहीत, याची खंत असून पुढील काळात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांना पक्षाने ताकद द्यावी, असे आवाहन चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.
चिपळूण-संगमेश्वर-गुहागर तालुक्याच्या युवक काँग्रेसचा मेळावा धवल मार्ट येथे शुक्रवारी झाला. सुरुवातीला चिपळूण काँग्रेसचे बेसिक तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, युवक प्रदेश पदाधिकारी सोनललक्ष्मी घाग आदींनी युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे स्वागत केले. यावेळी प्रशांत यादव पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षात किती युवक येण्यास इच्छुक आहेत, हे दाखविण्याची आज संधी मिळाली आहे. चिपळूण तालुक्यात काँग्रेस पक्षाचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले सदस्य नाहीत, याची खंत आहे. युवकांना काँग्रेस पक्षात काम करण्यासाठी संधी देण्याची गरज आहे. ती संधी युवक जिल्हाध्यक्ष अविनाश मोहितेंमुळे मिळत आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे हातपाटी वाळूचा प्रश्न मांडला आणि तो प्रश्न थोरात यांनी सोडवला आहे, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, अनुसूचित जाती-जमाती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश कांबळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर, माजी नगरसेवक सुरेश राऊत, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते, चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले, महिला आघाडी तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, सेवादल चिपळूण तालुकाध्यक्ष अश्फाक तांबे, अल्पसंख्याक सेल चिपळूण तालुकाध्यक्ष अनवर जबले, रफिक मोडक, युवक गुलजार कुरवले, उपातालुकाध्यक्ष रुपेश आवले, ऋषिकेश शिंदे, वासुदेव मेस्त्री आदी उपस्थित होते.