चिपळूण : पंचायत समितीच्या उपसभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रताप शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्यासह सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग माळी यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपसभापतीपद शिवसेनेकडे देण्याचे महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरले होते. त्यानुसार गेल्या महिन्यात सभापतीपदी रिया कांबळे यांची वर्णी लागली होती. तर आता उपसभापतीपदी शिवसेनेचे प्रताप शिंदे यांची वर्णी लागली आहे. उपसभापती पदावरून शिवसेनेत धुसफूस सुरू होती. शेवटी खासदार विनायक राऊत यांनी प्रताप शिंदे यांचे नाव जाहीर करीत वादावर पडदा पाडला होता.