लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : झरेवाडी येथील पाटीलबुवाच्या मठाची शासनाकडून चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी शासनाला पत्र देऊन मठाची चौकशी करण्याबाबतची मागणी करण्याची सूचना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या प्रमुख मुक्ता दाभोलकर यांनी रत्नागिरी येथील बैठकीदरम्यान केली.पाटीलबुवा विरोधात आता सर्वच संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधातील धार अधिक तीव्र झाली आहे.मी रत्नागिरीकर ग्रुप, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, अखिल भारतीय अंधश्रध्दा समिती, लक्ष्यसिध्दी फाऊंडेशन, चेतना फाऊंडेशन, संस्कार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील केतन मंगल कार्यालयात रविवारी आयोजित बुवाबाजीविरोधी संघर्ष सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनिल विभुते, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सरचिटणीस नितीन राऊत, झरेवाडीचे सरपंच चंद्रकांत गोताड, विलास कोळपे उपस्थित होते.अन्यायग्रस्तांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करीत असतानाच अज्ञानाचा मार्ग अवलंबणाºयांना परत फिरवायचे आहे. गेल्या २७ वर्षांत अंनिसने शेकडो लढाया लढल्या आहेत. एका ठिकाणची बुवाबाजी संपते तेव्हा दुसरीकडे सुरू होणार नाही, याबाबत न्यायालयाची महत्त्वपूर्ण भूमिका असली पाहिजे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर पाटीलबाबाची चर्चा सुरू आहे. लोक खासगीत बाबाबद्दल खूप बोलतात. परंतु तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी जनतेचे मनोबल वाढवले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील साक्षीदार शोधून पीडित तक्रारदारांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. जादुटोणाविरोधातील कायदा संपूर्ण भारतात लागू व्हावा, ही अंनिसची मागणी आहे. लढाई लढणारे तुम्ही एकटे नाहीत, अंनिस आपल्याबरोबर आहे. परंतु पीडितांनी आवर्जून पुढे येऊन बोलणे आपली जबाबदारी आहे. सध्या ग्रामीण भागातून लोकांचे प्रबोधन करणे, मांत्रिक बाबांची यादी तयार करून पोलिसांना सादर करणे, आदी महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे दाभोलकर यांनी सांगितले.जादूटोणाविरोधी कायदा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंनिस प्रयत्नशील आहे. अंनिस छोटी असल्यामुळे तिची ताकद मर्यादित आहे. परंतु जनतेचे जागरूकपणे अशा प्रकारच्या बुवांचा कडाडून विरोध करणे गरजेचे आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक विभुते यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. लोकांचे मनोबल उंचावण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. त्यामुळे अन्याय सहन करून गप्प बसण्यापेक्षा त्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.मठ बंद झालाच पाहिजेरत्नागिरीतील बैठक आटोपून मुक्ता दाभोलकर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्याशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन हा मठ बंद झालाच पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पाटीलबुवाच्या मठाची शासनामार्फत चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:22 PM