रत्नागिरी : शहरानजिकच्या हातखंबा व कारवांचीवाडी येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर या संस्थेमधील बालकांनी, राज्यातील पूरग्रस्त हतबल न होता या संकटाला धीराने सामोरे जाण्यासाठी त्यांना बळ मिळावे, यासाठी प्रार्थना केली.
माहेरमध्ये अनेक अनाथ, निराधार, दुर्लक्षित, वंचित बालके व निराधार महिला पुरुष दाखल होत असतात. या सर्वांना आपुलकीने सांभाळण्याचे काम माहेर ही संस्था करीत आहे. सामाजिक संवेदनशीलता ही मुलांच्या अंगी बाणवावी, यासाठी विविध सामाजिक उपक्रम संस्था राबवत असते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये तसेच कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणात- रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, महाड या ठिकाणी महापुरासारख्या संकटाने थैमान घातले होते. महापुरामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले. काही ठिकाणी दरड कोसळून कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अशा सर्वांना शासनाकडून व समाजातून मदतीचा ओघ सुरूच आहे.
हे संकट लवकरात लवकर टळावे व पूरग्रस्तांचे जीवन सुरळीत व्हावे, यासाठी माहेर संस्थेतील सर्व बालकांनी पूरग्रस्तांसाठी व पूरग्रस्तांना सढळ हाताने मदत करणाऱ्यांसाठी प्रार्थना केली व या नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी झालेल्या लोकांना, प्राणिमात्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी प्रत्येकाने पूरग्रस्तांना त्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही ना काही मदत केली पाहिजे, असे सांगितले. पूरग्रस्त हतबल न होता या संकटाला धीराने सामोरे जाण्यासाठी त्यांना बळ मिळावे, या प्रार्थनेसाठी माहेर संस्थेतील सर्व बालके, महिला, पुरुष व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.