रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाबाबत पूर्वनोंदणी अत्यावश्यक करण्यात आली आहे. आज याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला असून, ऑनलाइन नोंदणीनंतरच आता लसीकरण होणार आहे.
२२ एप्रिलपासून शहरातील लसीकरण केंद्रावर थेट जाऊन लस मिळणार नाही. आतापर्यंत रांग लावून लसीकरण केले जात होते. मात्र लस घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आता ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधितांना मेसेज येईल. त्यानंतरच त्याने त्या वेळेनुसार लसीकरण केंद्रावर जायचे आहे. हा निर्णय फक्त शहरी भागातील लसीकरण केंद्रासाठीच आहे.
रत्नागिरी शासकीय रुग्णालयाच्या आवारात लसीकरणासाठी उघडण्यात आलेले लसीकरण केंद्र आता उद्यापासून गोगटे जोगळेकर कॉलेजजवळील मिस्त्री हायस्कूल येथे हलवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बुधवारी दिले आहेत. गेले दोन दिवस शासकीय रुग्णालयाच्या आवारात असलेल्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. सुरक्षित अंतर नियमाची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे हे केंद्र आता मिस्त्री हायस्कूल येथे सुरू होत आहे.