रत्नागिरी : रोहिणी नक्षत्राला दिनांक २५ मेपासून प्रारंभ होणार आहे. धूळवाफेच्या पेरण्यांना रोहिणी नक्षत्रापासून प्रारंभ होत असल्याने शेतीच्या मशागतीची कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बहुतांश ठिकाणची भाजावळीची कामे अंतिम टप्प्यात असून, भात बियाणे, खत खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने भातशेती केली जात असल्याने शेतकरीवर्ग पेरणीसाठी बियाणे, खतांची खरेदी करत आहे. जिल्ह्यात ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात येते. शिवाय १३ हजार हेक्टर क्षेत्रावर नागलीची लागवड केली जाते. पेरणीपूर्वी मशागतपूर्व कामाचा भाग म्हणून भाजावळीची कामे अद्याप सुरू आहेत. मान्सून सुरू होण्यास अवधी आहे. पेरणी करण्यात येणारी जमीन भाजल्यानंतर सफाई करण्यात येते. सफाईबरोबर शेतामध्ये शेण टाकण्यात येते. कुळीथ व अन्य पिके घेतलेल्या शेतजमिनीत पावसाच्या सुरूवातीलाच धूळवाफेच्या पेरण्या करण्यात येतात. रोहिणी नक्षत्रावर पाऊस पडतो. मात्र, अवकाळी पाऊस हजेरी लावत असतोच. मृग नक्षत्राच्या प्रारंभी सुपीक जमिनीवर पेरणी केली जात असली तरी रोहिणी नक्षत्रातील धूळवाफेच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे.
सध्या आंबा काढणीचे काम सुरू आहे. त्यामुळे बहुतांश मजूर आंबा काढणीच्या कामात मग्न आहेत. कलम बागेत शेणखत, सेंद्रियखते रासायनिक खते पावसाळ्यात घालण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी खतांच्या खरेदीसाठी नोंदणी सुरू केली आहे. विविध सहकारी सोसायट्यांमार्फत शेतकरी खते खरेदी करीत असून, त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त भात बियाणी बाजारात विक्रीसाठी आली आहेत. भात पिकाबरोबर नाचणीचे दुय्यम पीक घेण्यात येते. नाचणी, तृणधान्य, भाजीपाला, कडधान्याच्या बियाण्याची मागणी होत आहे. हळद, आल्याचे बियाणेदेखील विक्रीसाठी तयार करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची, तर ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. जिल्हा फलोत्पादन झाल्यापासून लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. नारळ लागवडही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा, काजू, नारळ, सुपारी, पेरू, चिकू तसेच मसाल्याची रोपे खरेदीसाठी आतापासून संपर्क सुरू केला आहे. रोपांचा दर्जा, दराबाबत घासाघीस सुरू आहे. शासकीय नर्सरी व खासगी नर्सरीतील दरामध्ये फरक असला तरी कलमे / रोपांचा दर्जा पारखला जात आहे.
पाण्याची पातळी खालावल्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलावर्ग पायपीट करीत आहेत. शहरात, ग्रामीण भागात टँकर धावत आहेत. नागरिक मात्र उकाड्याने हैराण झाले असून, कोरोना समाप्तीसह पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे.