मंडणगड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी अपुऱ्या पडत असलेल्या यंत्रणेने आता ग्रामपंचायतीचा आसरा घेतला आहे. ग्रामीण भागात कोरोेनाचा वाढता प्रादुर्भाव व होम आयसोलेशनमुळे कोरोनाचा प्रभाव वाढत आल्याचे लक्षात घेऊन संस्थात्मक विलगीकरणाचा पर्याय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी मंडणगड तालुक्यातील १०९ गावांतील ११ ठिकाणी विलगीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. याकरिता दोन हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींमधील शाळा, महाविद्यालये या ठिकाणी हे विलगीकरण कक्ष उभारण्यात येणार आहेत.
मंडणगड तालुक्यात अशाप्रकारे ११ गावांत विलगीकरण कक्ष उभारण्यात येणार आहेत. तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींपैकी ११ ग्रामपंचायतींची याकरिता निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी तालुक्यातील १०९ गावांतील नागरिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तालुक्यातील कुंबळे, पालवणी, लाटवण, शिरगाव, म्हाप्रळ, वेसवी, देव्हारे, उमरोली, बाणकोट, भिंगळोली व पणदेरी अशा ११ ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. व्यवस्था करण्यात आलेल्या प्रत्येक गावातील शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालयांच्या इमारती यासाठी वापरण्यात येणार आहेत. या ठिकाणी संपर्क अधिकारी म्हणून तेथील ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीसपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात नुकतेच १७८ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी अनेक जण गृहविलगीकरण तसेच गावातील बंद असलेली घरे, शाळा यांमध्ये विलगीकरण करून ठेवण्यात आले आहेत. एकीकडे शासनाने चाचण्या वाढवल्या, मात्र बाधित रुग्णांना विलगीकरण करून ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे. आणि आता सुरू करत असलेल्या ग्रामपंचायतस्तरावरील विलगीकरण केंद्रांवर प्रशासनाने सर्व व्यवस्था करावी, अशी अपेक्षा मांडली जात आहे.
कोट
पंचक्रोशीतील सर्वसामान्यांसाठी ग्रामपंचायत ही जबाबदारी पेलण्यास तयार आहे. शासनाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार आहाेत; पण या ठिकाणची सर्व व्यवस्था प्रशासनाने स्वत: करावयाची आहे. प्रशासनाने याची जबाबदारी स्वत: घ्यावी. ग्रामपंचायत मदतीसाठी सदैव तयार राहणार आहे. आजवर गावातील लोकांच्या अडीचणीच्या काळात ग्रामपंचायत नेहमीच सहकार्य करत आली आहे. आता पंचक्रोशीतील जनतेसाठीही सहकार्य करणार.
- किशाेर अनंत दळवी, सरपंच, ग्रामपंचायत, कुंबळे