रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीसमोर सादर करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या विकासकामांचे आराखडे १८ जुलैपर्यंत तयार करुन ते पूर्ण करावेत, अशी सूचना झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्याची माहिती प्रभारी अध्यक्ष संतोष थेराडे यांनी दिली.ही सभा प्रभारी अध्यक्ष संतोष थेराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला गटनेते उदय बने, सदस्य दीपक नागले, विनोद झगडे, सदस्या रचना महाडिक, चारुता कामतेकर, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. या सभेत जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांवर चर्चा झाली.जिल्हा नियोजन समितीसमोर ग्रामीण भागातील विकासकामांचा आराखडा तयार करावयाचा आहे. विविध खात्यांकडून आपापल्या अखत्यारितील कामांचा हा आराखडा करायचा आहे. जिल्हा नियोजनची बैठक पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै रोजी होणार आहे.
त्यापूर्वी १८ जुलैपर्यंत जिल्हा परिषदेच्या विकासकामांचा आराखडा तयार करण्यात यावा. तसेच विकासकामांची कागदोपत्री तयारी करावी, अशी सूचना अध्यक्ष थेराडे यांनी यावेळी दिली. यावेळी विरोध पक्षनेते विक्रांत जाधव यांनी प्रभारी अध्यक्ष थेराडे यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.थेराडे यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून विकासकामांना चालना मिळाली असून, ती लवकरच मार्गी लागत असल्याचे विरोधी पक्षनेते जाधव यांनी स्पष्ट केले. विकासकामांची कोणतीही फाईल टेबलवर जास्त काळ ठेवू नये, अशी सक्त सूचना अध्यक्ष थेराडे यांनी दिली.