चिपळूण : जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली असून, शनिवारीही पावसाची संततधार सुरुच आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीसह संगमेश्वर, दापाेली, गुहागर, खेड या भागात पावसाला सुरुवात झाली आहे.जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा येथील भारतीय हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या संदेशानुसार २४ जून २०२२ ते २७ जून २०२२ या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. २४ जून ते २८ जून २०२२ या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी ४०-५० किलाेमीटर ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तविण्यात आला आहे.मच्छिमारांनी या कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानंतर जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली हाेती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी खोळंबली होती. पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शनिवारी सकाळपासून अनेक भागात शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत.
दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेती कामाला जोर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 2:02 PM