खेड : तौक्ते चक्रीवादळ कोकणातून पुढे सरकल्यानंतरही पावसाचा मुक्काम कायम असून, बुधवार दिनांक १९ रोजी खेड शहरासह तालुक्यात दिवसभर पाऊस पडत आहे. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अरबी समुद्रात दिनांक १६ रोजी तौक्ते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून गेले. हे वादळ १८ रोजी कोकणातून पुढे सरकले असले तरी चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला असून, तेव्हा सुरू झालेला पाऊस बुधवारीही सुरूच होता. खेड शहर व ग्रामीण भागात मंगळवारी मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे बहिरवली खाडीपट्टा मार्गावर कोरेगाव या ठिकाणी मोठा वृक्ष कोसळला. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबके कोरेगाव या परिसरातील तरुणांनी मार्गावर कोसळलेले झाड बाजूला करून मार्ग वाहतुकीस खुला केला.
बुधवारी संपूर्ण तालुक्यात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने चांगलीच दाणादाण उडविली. तौक्ते चक्रीवादळामुळे काही भागात खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी काम करीत होते. मात्र, पावसाच्या सरींमुळे त्यामध्ये व्यत्यय निर्माण झाला. शहरातील विजेअभावी गेले दोन दिवस विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी प्रयत्नशील आहेत. नगर परिषदेने अनेक भागात नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला आहे. चक्रीवादळानंतरही पावसाची संततधार सुरू राहिल्याने जगबुडी व नारिंगी या दोन्ही नद्यांची पाणी पातळी काही प्रमाणात वाढली आहे.