लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : कोकणच्या निसर्गाचा ऱ्हास न करता विकास झाला पाहिजे. विकास करताना कोकणचे कोकणपण टिकवून ठेवा. कोकणी माणूस विकासाच्या ध्येयाने झपाटलेला आहे. या झपाटलेपणाला विचाराचे अधिष्ठान दिले पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. सरकारी विकास मर्यादित असतो. भूभागाचा विकास करताना व्यक्तीचा विकासही झाला पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘कोकणचा शाश्वत विकास’ या परिसंवादाचा समारोप सुरेश प्रभू यांनी केला. यावेळी ते बाेलत हाेते.
पहिल्या दिवशी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, गद्रे मरिन्सचे दीपक गद्रे, प्रगतशील शेतकरी विनायक महाजन, उद्योजक जयंत देसाई, माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, डॉ. प्रकाश शिंगारे सहभागी झाले हाेते. दुसऱ्या दिवशी कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव, पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, अभ्यासक डॉ. दीपक आपटे, डॉ. उमेश मुंडले हे मान्यवर सहभागी झाले. पर्यटन, पायाभूत सुविधा विकास, पर्यावरण व पाणी व्यवस्थापन या विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानचे मिहीर महाजन, दीपक महाजन यांनी संयोजन केले. ऋतुजा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले की, नैसर्गिक साधनसंपत्तीला नष्ट न करता आर्थिक विकास झाला पाहिजे. मोठा पाऊस आपल्याबरोबर कस असलेली माती वाहून नेणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला पर्यटनातून काम मिळू शकते. व्यक्ती आणि गाव एकत्र असले पाहिजे, संवादाला कृती कार्यक्रमाची जोड देऊया, असे प्रभू म्हणाले.
कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत म्हणाले की, नैसर्गिक संकटात कोकणी माणूस खचून गेला असला तरी कोकणचे अर्थकारण जपण्यासाठी शेती जपली पाहिजे आणि ती करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कोकणची तुटीची शेती फायद्यात आणली पाहिजे. चाकरमानी माणसांना गावाशी जोडून ठेवले पाहिजे. शाश्वत विकास होताना त्याचा वेग पेलणारा असला पाहिजे आणि लोकसहभाग असला पाहिजे. उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करून पिके घेतली पाहिजेत, असे सांगितले. या परिसवांदात विनय महाजन, डॉ. प्रकाश शिंगारे, संजय यादवराव, डॉ. उमेश मुंडले, डॉ. दीपक आपटे, हनुमंत हेडे यांनीही मनाेगत व्यक्त केले.
-----------------------
साडेतीनशे किलोमीटर लांबीचा किनारा आणि तीन जिल्ह्यांत असलेली वेगवेगळी पिके याचा उपयोग करून घेतला पाहिजे. शेती आणि पूरक उद्याेगांसाठी कमी व्याजाने कर्ज मिळाले पाहिजे. हापूससारखे फळ हे भारतभर सफरचंदासारखे मिळाले पाहिजे.
- जयंत देसाई
---------------------
कोकणातील मासेमारीला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. माशांवरील प्रक्रिया उद्याेगात आणि शेवाळ शेतीत आपण उतरले पाहिजे.
- दीपक गद्रे