मंडणगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद १२ फेब्रुवारी २०२२ रोजी मंडणगड तालुक्याच्या दाैऱ्यावर येणार आहेत. या दाैऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळगावाला ते भेट देणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या तयारीकरिता प्रशासकीय स्तरावर युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या दाैऱ्याची तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंडणगड शहरापासून चार किलोमीटर लांबीवर असलेल्या शिरगाव येथील मोकळ्या मैदानात पक्के डांबरीकरण केलेले हेलिपॅड निर्मितीचे काम हाती घेण्यात आले, तर राष्ट्रीय महामार्गाने प्राधिकरणाने दौऱ्यानिमित्त बनविण्यात आलेले हॅलिपॅड लोणंद- आंबडवे राष्ट्रीय महमार्गाला लागून असल्याने या मार्गावर खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात केली आहे.पोलीस निरीक्षक व तहसीलदारांनी मंगळवारी आंबडवे गावाचा दौरा केला. महापरिनिर्वाणदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद महामानावाला अभिवादन करण्यासाठी आंबडवे या मूळ गावाला भेट देणार होते; परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तो दौरा रद्द झाला होता; परंतु आता नव्याने राष्ट्रपतींचा आंबडवे भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.