मंडणगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद १२ फेब्रुवारी २०२२ रोजी मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावाला भेट देणार आहेत. या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज, शनिवारी (५ फेब्रुवारी) मंडणगड तालुक्याचा दौरा करून आढावा घेतला.राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या दाैऱ्याच्या निमित्ताने जिल्हा पोलीस दलासह सर्वच शासकीय यंत्रणांचे उच्चपदस्थ अधिकारी पूर्वतयारीला लागले आहेत. या दाैऱ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. पाटील शनिवारी मंडणगड येथे आले हाेते. त्यांनी शिरगाव येथील मैदानाला भेट दिली. या मैदानात चार पक्के डांबरीकरण केलेले हेलीपॅडचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याठिकाणी स्वच्छतागृह, वीज, पाणी व इंटरनेटची उपलब्धता हाेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.जिल्हाधिकाऱ्यांनी आंबडवे गावालाही भेट देऊन माहिती घेतली. या दाैऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक पथक गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात दाखल झाले आहे. शिरगाव येथील हेलीपॅडसह भिंगळोली येथील शासकीय निवासस्थानांचीही डागडुजी करण्यात आली आहे. शिरगाव येथून आंबडवे येथे जाण्यासाठी २२ किलोमीटर इतके अंतर गाडीने पार करावे लागणार आहे. त्याकरिता आंबडवे ते लोणंद रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.भिंगळाेली व मंडणगड बाजारपेठेतून १०, ११, १२ फेब्रुवारी २०२२ या तीन दिवसांच्या कालवधीत गाड्यांचा फौजफाट जाणार आहे. व्यापाऱ्यांना या कालावधीत सुरक्षा व स्वच्छता यांच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या. स्थानिक पोलिसांनी सर्व व्यापाऱ्यांना यासंदर्भात नोटीस दिल्या आहेत. दौऱ्याच्या वेळी शिरगाव ते आंबडवे या रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा, युध्दपातळीवर तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 6:31 PM