आवाशी : खेड तालुक्यातील लोटे - परशुराम येथील औद्योगिक वसाहतीत मंदीची लाट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या वसाहतीतील अनेक कारखाने या मंदीमुळे मेटाकुटीला आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र, या मंदीतही तग धरुन असलेले उद्योग राजकीय पक्ष्यांच्या दबावामुळे अन्य ठिकाणी स्थलांतरीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. किती दिवस ही गळचेपी सहन करावी याचीच चर्चा सध्या येथील उद्योजकांतून सुरु आहे.मागील तीस वर्षांपासून येथे अनेक उद्योग कार्यरत आहेत. मोठ्या प्रमाणावर रासायनिक उद्योग याठिकाणी आहेत. रासायनिक उद्योग असल्याने सर्व शासकीय बंधने या उद्योगांना लागू आहेत. याचाच फायदा येथील राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांनी उचलत या कंपन्यांवर अंकुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. किंबहुना करत आहेत. याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास सी. ई. टी. पी. म्हणजेच सामुदायिक सांडपाणी प्रकल्प केंद्र. या ठिकाणी अनेक मोर्चे, उपोषणे, रास्तारोको यासारख्या असंख्य गोष्टी राजकीय पक्षांकडून करण्यात आल्या. त्यावेळी लागलेली ही कीड आता आणखीनच वाढीस लागली आहे. मग पदाधिकारीच नव्हेत तर सर्वसामान्य कार्यकर्तेही कॉलर ताठ करून अनेक कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर जाऊन काम बंद, मालकाला बोलाव, कार्यालयात भेटायला सांग, तर काहीवेळा गेटवर परवानगी न घेताच थेट मालकाच्या दालनात जाण्याची ताकद दाखवण्यास सुरुवात केली. कंपनी मालकांनीही मग नाईलाजास्तव त्यांचे स्वागत करण्याचे धारिष्ट दाखवण्याचा खटाटोप सुरु केला. यामुळे खऱ्या अर्थाने येथे राजकीय वर्चस्व उदयास आले. या गोष्टीला उद्योजकही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या राजकीय मंडळींनी कधी मागे वळून पहिलेच नाही. मग इथे राजकीय आखाडाच खेळला जाऊ लागला. राजकीय पक्षांच्या विविध कार्यक्रमाबरोबरच अनेक उपक्रमांसाठी कंपन्यांकडे निधीची मागणी करण्यात आली. यामुळे कंपनी प्रशासन मेटाकुटीला आले आहेत. त्यातच एकाला मदत दिल्यानंतर दुसऱ्याला न दिल्यास त्याचे दुष्परिणामही कंपनीला भोगावे लागत आहेत. एकाला दिले तर दुसऱ्याला का नाही, म्हणून उद्योजकांच्या कानशिलापर्यंत यांचा हात पोहचू लागला. आता मात्र भिक नको पण.........अशी स्थिती इथे निर्माण झाल्याचे उद्योजक दबक्या आवाजात सांगू लागले आहेत. इतके करूनही आमदार, खासदार, मंत्री कंपन्यांच्या सी. एस. आर.चा खुलासा मागू लागले आहेत. त्यामुळे आजवर दिलेल्या सर्व देणग्या सी. एस. आर.मध्ये येत नाहीत का? असा प्रश्न उद्योजकांना पडला आहे.यामुळे आता उद्योग व्यवस्था मेटाकुटीला आली असून, कुठल्याही क्षणी स्थलांतरीत होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे. किती दिवस तोंड दाबून बुक्क्याचा मार खायचा? असा प्रश्न आता उद्योजकांना सतावत आहे. याच कारणाने अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत येऊ घातलेले अनेक कारखाने गेली काही वर्ष हुलकावणी देत असावेत, असा अंदाज जाणकारांतून वर्तवला जात आहे. (वार्ताहर)खेड तालुक्यातील लोटे - परशुराम येथील औद्योगिक वसाहतीत मंदीची लाट़मंदीमुळे अनेक कारखाने मेटाकुटीला आले आहेत.मंदीतही तग धरून राहिलेल्या कंपन्यांवर राजकीय दबाव.औद्योगिक वसाहतीत अनेक ासायनिक उद्योग.शासकीय बंधनाचा फायदा उठवत कंपन्यांवर अंकुश ठेवण्याचे काम.कानशिलापर्यंत पोहचले हात.
राजकीय दबावामुळे उद्योजकांची गळचेपी
By admin | Published: March 18, 2016 10:34 PM