रत्नागिरी : आचारसंहितेनंतर प्रतिबंधात्मक कारवाईंवर अधिक भर देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १५९ जणांना अजामीनपात्र नोटीसा बजावण्यात आल्या आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील तिघांना तडिपार करण्यात आले आहे. अंमली पदार्थांचे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.निवडणुकीशी संबंधित गुन्हे दाखल करण्यावर अधिकाधीक भर दिला जात आहे. अवैध दारूधंद्यांवर कारवाई सुरू आहेत. या कालावधीत १११ छापे टाकण्यात आले असून त्यातून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ९३ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात ९ लाख ४२ हजार ६७८ किंमतीची १०४७ लिटर हातभट्टीची दारू, ७३.४८ लिटर विदेशी दारू, ४२.४८ लिटर देशी दारू तसेच रसायन जप्त करण्यात आले आहे.तसेच अजामीनपात्र नोटीस बजावण्यावरही भर देण्यात येत आहे. पाहिजे असलेले आणि फरीरी असलेले आरोपी यांची शोध मोहीम सुरू आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने चिपळुणातील एक आणि रत्नागिरी शहरातील दोन अशा एकूण तीन जणांना तडिपार करण्यात आले आहे. अजुनही जे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. त्यामुळे सर्वांनी न भिता मतदानाचा हक्क बजावावा, या उद्देशाने रत्नागिरी, चिपळूण, दापाेली आदी शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागामध्येही पोलिसांचे पथसंचलन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही असेच पथसंचलन करण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले. १.१३ कोटीची १६ लाख लिटर दारू जप्तलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघात १९ मार्च रोजी कणकवली मतदार संघात १० लाख आणि २५ मार्च रोजी सावंतवाडी मतदार संघात ४ लाख अशी एकूण १४ लाख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. या दोन्ही मतदार संघात मिळून १ कोटी १३ लाख ५८ हजार ३५० रूपये किंमतीची १६ लाख ३०० लिटर दारू जप्त करण्यात आली. तसेच या कालावधीत १७०० रूपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात ४२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तिघे तडिपार
By शोभना कांबळे | Published: April 11, 2024 5:42 PM