लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोकणातील प्रत्येकाच्या घरात साखरेबराेबरच किंवा त्यापेक्षाही गुळाचे महत्त्व आहाराच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर औषधी म्हणूनही गुळाकडे पाहिले जात असल्याने त्याचे स्थान स्वयंपाकघरात अढळ असेच आहे. सणासाठी आणि रोजच्या वापरासाठीही गुळाचा वापर नियमित केला जातो. मात्र, सध्या कोरोनाच्या दृष्टीने रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे विविध पदार्थ बनविण्यासाठी गुळाचा वापर केला जाऊ लागला असल्याने आता गुळाला साखरेपेक्षाही मागणी वाढली आहे.
पित्त, खोकला यावर गुणकारी असलेल्या गुळात लोह आणि झिंक यांचे प्रमाण अधिक असते. गुळाचा औषधी गुणधर्म असल्याने तो आयुर्वेदिक औषधांमध्ये उदा. अनेक आसव यांच्यात वापरला जातो. काही औषधे गुळासोबत घेतल्यानेच ती प्रभावी ठरतात, हे आयुर्वेदातून सिद्ध झालं आहे.
सध्या कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे असल्याने विविध प्रकारचे पाैष्टिक पदार्थ किंवा औषधी काढे बनविण्यासाठी सध्या गुळाचा वापर वाढला आहे. गूळ आणि गाईचे तूप यांचे मिश्रण असलेले अनेक पाैष्टिक पदार्थ प्रकृती उत्तम राखण्यास मदत करतात, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे सध्या कोरोनाकाळात या गुळाचा वापर अधिकच वाढला आहे. त्यामुळे शहरात आता साखरेपेक्षा गुळाला अधिक महत्त्व आले आहे. गुळाच्या काळ्या चहाचीही पसंती वाढली आहे.
प्रकृतीसाठी गूळ उत्तम
गुळामधून लोह, झिंक मिळते. तुपासोबत पाैष्टिक पदार्थांत वापरला जातो. पित्त, कफ दूर करणारा, उन्हाचा शीण घालवणारा आहे. मात्र, तो जुना आणि मळीविरहीत असावा. त्यात दोषही आहेत, त्यामुळे त्याचा वापरही मर्यादेत करायला हवा.
- वैद्य सिद्धेश जोशी (आयुर्वेद), रत्नागिरी
n पूर्वी ग्रामीण भागात गुळाचा वापर अधिक असायचा. साखरेचा वापर श्रीमंत करतात, असा समज होता.
n परंतु त्यानंतर साखर सामान्यांसाठी कमी दरात रेशन दुकानावर उपलब्ध होऊ लागली आणि गुळाचे दर वाढले.
n मागणीपेक्षाही उत्पादन वाढल्याने साखरेचा दर फारसा वाढला नाही. मात्र, गुळाचा दर वाढला.
n आयुर्वेदाने गुळाचे औषधी गुणधर्म आधीच सिद्ध केले होते. मात्र, काही काळानंतर ते लोकांच्या लक्षात आल्याने काळ्या चहाला पसंती मिळू लागली.
n कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आयुर्वेदिक काढे, काळा चहा यांचे महत्व वाढले. त्यामुळे गुळाच्या काळ्या चहाने स्टेटस वाढविली.
n सध्या बहुतांश आस्थापना, काही कार्यालयांमध्ये, काळ्या चहाला प्राधान्य दिले जात आहे.
गावात पूर्वी साखरेऐवजी गुळाचा वापर केला जात असे. त्यावेळी साखरेचा दरही गुळापेक्षा अधिक होता. मात्र, आता साखरेचा दर कमी झाला आहे. सामान्य जनतेला रेशनवर कमी दरात साखर मिळते. सणासुदीला अधिक दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागात आता साखर वापरली जात आहे.
- जयू पाखरे, व्यापारी, पाली (ता. रत्नागिरी)
तसं पाहिलं तर गुळाचा वापर प्रत्येक स्वयंपाकघरात होतो. काही पदार्थातील दोष घालविण्यासाठी किंवा औषधी गुणधर्मासाठी गूळ वापरला जातो. काेरोनाच्या काळात पाैष्टिक पदार्थ आणि औषधी गुणधर्माचा म्हणून गुळाचा खप वाढल्याचे दिसून येते.
- उदय पेठे,
व्यापारी, रत्नागिरी
कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर लोकांकडे गुळाचा वापर अधिक होऊ लागला आहे. पूर्वी शहरामध्ये साखरेचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता गुळाचे औषधी गुणधर्म लोकांना कळल्याने गूळ खरेदी करण्याकडे पूर्वीपेक्षा अधिक कल वाढला आहे.
- ओंकार शिंदे,
व्यापारी, रत्नागिरी.