शोभना कांबळेरत्नागिरी : डिझेलच्या दरवाढीचा परिणाम बांधकाम साहित्याच्या दरांवर झाला आहे. त्यामुळे आधीच सिमेंट, स्टील, काच, पीव्हीसी पाईप, खडी आदींचे दर वाढले असतानाच डिझेलने शंभरी पार केल्याने पुन्हा बांधकाम साहित्याचे दर वाढले आहेत. परिणामी घरांच्या किमतीत वाढ करणे अपरिहार्य असल्याचे मत बांधकाम क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
कोरोनाकाळानंतर ठप्प झालेल्या बांधकाम व्यवसायाला ऊर्जितावस्था यावी, सामान्यांना घर घेता यावे यासाठी शासनाने मुद्रांक शुल्क आणि जीएसटीच्या दरात कपात केली. त्यामुळे घर घेणाऱ्यांना दिलासा मिळाला. गेल्या ऑक्टोबर महिन्यात लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने घरात अडकलेले नागरिक बाहेर पडू लागले. सरकारने ग्राहकांना देऊ केलेल्या सवलतींंमुळे घरांची मागणी वाढली. बांधकाम व्यवसायाला गती मिळाली. घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना दिलासा मिळाला.
मात्र, ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलबरोबरच डिझेलच्या दराचा आलेख वाढू लागल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. वाहतुकीचे दर वाढल्याने बांधकामाच्या विविध साहित्यांच्या दरात जवळपास ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढला. त्यामुळे घरांच्या किमती वाढल्या आहेत.
सिमेंटच्या दरात सुमारे ८० रुपयांची वाढ झाली आहे. २०२० साली स्टील ४८ रुपये किलाेने खरेदी केले जात होते. यंदा ते ६८ ते ७० रुपये किलो दराने घ्यावे लागत आहे. बांधकामासाठी खिडक्यांची तावदाने, दरवाजे यांच्यासाठी काच वापरतात. २०२० साली काच २७ रुपये चाैरस फूट होती. यंदा चाैरस फुटासाठी बांधकाम व्यावसायिकांना आता ४२ रुपये मोजावे लागत आहेत. २०२० साली खडी प्रतिब्रास २४०० रुपये हाेती, ती ३००० वर गेली. बारीक वाळू गेल्या वर्षी ४५०० ब्रास होती, यंदा ती ५५०० रुपयांवर गेली आहे.
बांधकाम साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी दरवाढ केलीच होती. अजूनही होणार आहे. त्यातच आता डिझेलच्या दरवाढीचा परिणाम बांधकाम साहित्यांचे दर वाढण्यावर होणार आहे. त्यामुळे घरांची किंमत ३०० ते ४०० चाैरस फुटाने वाढणार आहे. त्याचबरोबर बांधकामाचे दरही २००० ते २२०० ने वाढणार आहेत. - दीपक साळवी, अध्यक्ष, क्रेडाई, रत्नागिरी
डिझेल भरमसाठ वाढले आहे. त्यामुळे आता बांधकाम साहित्याच्या वाहतुकीचा दरही वाढला आहे. साहित्याचे दर गेल्या वर्षीपेक्षा यंदा अगदी ४० टक्क्यांनी वाढले आहेत. - साैरभ मलुष्टे, बांधकाम साहित्य व्यावसायिक, रत्नागिरी