लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : अनलाॅकमुळे भाज्या, फळांची उपलब्धता जिल्ह्यात सर्वत्र होत आहे. चारचाकी वाहनांतून भाजी विक्रेते गावोगावी विक्रीसाठी फिरत आहेत. गेले दोन आठवडे भाज्यांचे दर ‘जैसे थे’ आहेत. यावर्षी लाॅकडाऊनमुळे शिवाय कांद्याचे दरही जास्त असल्याने पावसाळ्यासाठी कांदा खरेदी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कांदा-बटाट्याला वाढती मागणी आहे. फळेही मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
भेंडी, गवार, घेवडा, सिमला मिरची, कोबी, फ्लाॅवर, शेवगा, टोमॅटो, हिरवी मिरची, गाजर, फरसबी विक्रीसाठी उपलब्ध असून, बहुतांश भाज्यांचे दर ७० ते ८० रूपयांच्या घरात आहेत. टोमॅटो २० ते ३० रूपये तर वांगी ३५ ते ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. कांदा २५ रूपये तर बटाटा २५ ते ३० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाल्याने परजिल्ह्यातील विक्रेते वाहनातून भाज्या, कांदा, बटाटा विक्रीसाठी गावोगावी फिरत आहेत. त्यामुळे भाज्या उपलब्ध होत असून, गेल्या आठवड्यापासून भाज्यांचे दरही ‘जैसे थे’ आहेत. पालेभाजी जुडी १० ते १५ रूपये दराने विकली जात आहे.
परराज्यातील आंबे सध्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नीलम, केशर, दशहरी, राघू, बलसाड आंब्यांना मागणी होत आहे. ६० ते १८० रूपये किलो दराने आंबा विक्री सुरू आहे. पावसात आंबे भिजल्याने काळे पडत असून, कुजण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
लाॅकडाऊन काळात ६० ते ७० रूपये किलो दराने विकण्यात येणाऱ्या टोमॅटोचे दर मात्र आता आवाक्यात आले आहेत. २० ते ३० रूपये किलो दराने विक्री सुरू असून, दर आणखी खाली येणे अपेक्षित आहे.
गेले कित्येक महिने २२ ते २५ रूपये दर स्थिर असलेल्या बटाट्याचे दरात गेल्या आठवड्यापासून वाढ झाली आहे. २५ ते ३० रूपये किलो दराने विक्री सुरू आहे. पावसामुळे बटाटा टिकत नसल्याची तक्रार ग्राहकांमधून होत आहे. पाच रूपयांनी दरात वाढ झाली आहे.
अनलाॅकमध्ये भाज्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी येत आहेत. भाजी विक्रेते वाहने घेऊन गल्लोगल्ली, वाडीवस्तीवर फिरत असल्याने भाज्यांची उपलब्धता होत आहे. गावठी भाज्या श्रावणात उपलब्ध हाेणार असून, सध्या परजिल्ह्यातील भाज्यांचा वाढता खप आहे. ७० ते ८० रूपये किलो दराने भाज्यांची विक्री सुरू असून, दर आणखी खाली येणे अपेक्षित आहे.
- राजश्री रेवाळे, गृहिणी
कांद्याच्या दरात घट मात्र बटाट्याच्या दरात काहीअंशी वाढ झाली आहे. वास्तविक कांदा, बटाट्याचा दैनंदिन स्वयंपाकात वापर केला जात असल्याने दर बऱ्यापैकी स्थिर असणे आवश्यक आहे. मात्र, दरातील चढ-उतारामुळे ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर महागाईचा परिणाम होत असल्याने सामान्य माणसाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
- कल्पना ठोंबरे, गृहिणी