रत्नागिरी : कोविड काळामध्ये रुग्णांच्या सेवेबरोबरच जबाबदारीने स्वच्छतेची कामे पार पाडणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालय आणि नगरपरिषदेच्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेतर्फे करण्यात आला. शहरातील जयस्तंभ येथील महिला मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
नेत्रतपासणी शिबिर
पावस : अनुलोम प्रेरीत जनसेवा सामाजिक मंडळ, गोळप यांच्या सहकार्याने गोळप येथील पाटणकर कार्यालय येथे मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी लायन्स हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या मरणोत्तर नेत्रदान सुविधेबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी ७५ लोकांची मोतीबिंदू तपासणी झाली.
फलक गायब
साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील चालकांसाठी लावण्यात आलेले सूचनाफलक झाडांमुळे गायब झाले आहेत. ठिकठिकाणी झुडपे वाढल्याने हे फलक दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना या फलकांवरील माहिती वाचता येत नाही. त्यामुळे ही झाडे तोडावीत आणि हे फलक मोकळे करावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
सैनिक पाल्यांचा सत्कार
रत्नागिरी : दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकांच्या विधवा यांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पात्र पाल्यांचा प्रस्ताव ३० सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी येथे सादर करावा.
मोकाट जनावरांचा उपद्रव
दापोली : शहरातील मुख्य ठिकाणी तसेच वर्दळीच्या जागी मोकाट जनावरांच्या झुंडी वावरत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, याकडे नगरपंचायत प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. मोक्याच्या आणि रहदारीच्या ठिकाणी ही मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेली असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.