रत्नागिरी शहरातील गाेगटे - जाेगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या स्वयंसेवकांसाेबत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रफुल्लदत्त कुलकर्णी तसेच शिक्षक उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काेविड - १९ च्या काळातही रत्नागिरी शहरातील गाेगटे - जाेगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा याेजना विभागाचे सामाजिक उपक्रम सुरूच हाेते. सामाजिक उपक्रमातून लाेकांमध्ये जनजागृती करून सतत कार्यरत राहणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा नाेव्हार्टीस आराेग्य विभागातर्फे सन्मानचिन्ह देऊन गाैरव करण्यात आला.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समाजकार्य कोविड-१९ महामारीदरम्यानसुद्धा स्वयंप्रेरणेने विविध क्षेत्रांत जोमाने सुरूच आहे. महाविद्यालयाचे स्वयंसेवक रत्नागिरी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात सहकार्य करीत आहेत. तसेच व्यसनमुक्ती, कोविड-१९ दरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबत या स्वयंसेवकांनी आतापर्यंत जिल्हाभरात ३० पथनाट्ये सादर केली आहेत.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि नोव्हार्टीस आरोग्य परिवार यांच्यातर्फे रत्नागिरी तालुक्यात विविध ठिकाणी ताप, साथीचे रोग, स्वच्छता इत्यादी विषयांवर पथनाट्य मोहीम राबविण्यात आली. नोव्हार्टीस आरोग्य परिवाराच्या आरोग्यविषयक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल नोव्हार्टीस आरोग्य परिवारातर्फे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी नोव्हार्टीस आरोग्य परिवारचे बिरादार, तुशांत भिंगार्डे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कार्यक्रमाधिकारी डॉ. सोनाली कदम, प्रा. शिवाजी उकरंडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.