रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार दाेन दिवसांपूर्वी उघड झाला. शाळेत अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला पाेलिसांनी अटक केली असून, त्याला पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून त्या शिक्षकासह हे प्रकार लपवून ठेवणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी किंजळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत शनिवारी निलंबनाची नाेटीस बजावली आहे.संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेमधील शिक्षक संजय वामन मुळ्ये या शिक्षकाने विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार दाेन दिवसांपूर्वी उघड झाला. पीडित विद्यार्थिनीने शिक्षकाच्या वर्तनाला कंटाळून आपल्या पालकांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तत्काळ शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांची सभा घेण्यात आली. या सभेत संतप्त पालक व ग्रामस्थांनी झाल्या प्रकाराबद्दल जाब विचारल्यानंतर त्या शिक्षकाने सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पालक, ग्रामस्थ संतप्त झाल्याचे लक्षात येताच त्याने केलेल्या प्रकाराची कबुली दिली. या शिक्षकाला संगमेश्वर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान, याप्रकरणी संगमेश्वर पोलिस स्थानकात त्या शिक्षकावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी त्या शिक्षकासह हा सर्व प्रकार माहीत असणाऱ्या मुख्याध्यापिकेलाही निलंबित केले आहे.
मुख्याध्यापिकेने प्रकरण लपवलेजिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी किंजळे यांना त्या शिक्षकाचे प्रताप माहीत हाेते. त्याने विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन केल्याची कल्पनाही त्यांना होती. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई न करता किंवा वरिष्ठांना न कळविता त्या गप्प राहिल्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मुख्याध्यापिकेवरही निलंबनाची कारवाई केली आहे.