वाटूळ : काजू उत्पादक शेतकरी, संभाजी ब्रिगेडचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मिथिलेश देसाई यांनी काजू बी हमीभावासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली. यावेळी आमदार शेखर निकम हेही उपस्थित होते.
काजू उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी १ किलो काजू बी उत्पादन करायला विद्यापीठांच्या माहितीनुसार १२५ रुपये खर्च येतो. त्यामुळे काजूला १५० हमीभाव व ५० रुपये अनुदान मिळावे. हमीभाव देणे शक्य नसेल, तर गोवा सरकारच्या धर्तीवर किमान किलोमागे ५० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काजू बीचा दर गेल्या ४ वर्षांपासून खाली उतरला आहे. बाहेरच्या देशातील म्हणजे आफ्रिकेमधील काजू बी आयात खर्च पकडून ७० रुपयाला मिळते. त्यामुळे किमान महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये येणाऱ्या काजू बीवर आयात शुल्क वाढवून मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. काजू बोंडाला डीसिल्ड प्रोसेसिंग म्हणजे वाईन स्वरूपात करण्यास महाराष्ट्र सरकारने द्राक्ष व संत्र्याच्या धर्तीवर परवानगी द्यावी. वायनरीला परवानगी देता येत नसेल, तर बोंडांपासून बायोडिझेल व इथेनॉलसारखे इंधन तयार करणारे प्रकल्प उभारले जावेत, ओले काजूगर सोलण्याचे यंत्र विकसित करावे, बाजारात विकल्या जाणाऱ्या काजूगरावर, ते कोणत्या भागातील आहेत, याचा उल्लेख करण्याचे बंधन घालावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या मागण्यांना अजित पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या पाच मागण्यांपैकी किमान ३ मागण्या मान्य होतील, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे.