रत्नागिरी : शिक्षण विभागाच्या नियमानुसार वर्षभर विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्यात येते. त्यामध्ये विद्यार्थ्याची मानसिकता, कल, रूची, आवड, आकलन, विषयातील ज्ञान, आदी गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्यामध्ये टक्केवारी न ठरवता अ, ब, क अशी श्रेणी निश्चित केली जाते. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही वार्षिक परीक्षा रद्द केल्यामुळे सर्वकष मूल्यमापन पध्दत स्वीकारून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांचे शिक्षक सरसावले असून, काही शाळांनी दि. १० पर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.
लॉकडाऊनमुळे शाळांमधील अध्यापन तर बंदच शिवाय अन्य शिक्षण संस्थांचे कामकाजही थांबले होते. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे पूर्वीचे मूल्यमापन करून गुणपत्रिका बनविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांमध्ये गुणपत्रिका तयार करण्याची कामे सुरू आहेत.
वार्षिक परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या. स्थानिक पातळीवर शिक्षण समितीतर्फे बोर्डाच्या वगळता अन्य वर्गाच्या परीक्षा घेण्यात येतात. पूर्व नियोजनानुसार सहामाही परीक्षा पार पडली. परंतु वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना मागील परीक्षांचे मूल्यमापन करून गुण देण्याचे निश्चित केले आहे. शाळांनी गुणपत्रिकेचे काम हाती घेऊन, ऑनलाइन गुणपत्रिका वितरीत कराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याने गुणपत्रिकेच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. सलग दोन वर्षे वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आली असून, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनावर आधारित विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचा श्रेणीनिहाय निकाल व गुणपत्रिका दि. १० मे पर्यंत देण्याच्या सूचना प्रशासनाकडून सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांमधून निकालपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून निकालासाठी शाळेत गर्दी होऊ नये यासाठी वर्गनिहाय तारखा निश्चित करून पालकांना वेळापत्रक व्हॉट्सअपवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे दि.१० मे पर्यंत सर्व वर्गातील मुलांचे परीक्षा न देताच निकालपत्र हाती मिळण्याची शक्यता आहे.