लाेकमत न्यूज नेटवर्क
सागर पाटील / टेंभ्ये : कोविड-१९ चा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांमध्ये होऊ नये यासाठी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा शासन स्तरावरून रद्द करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची मूल्यमापन पद्धत नुकतीच जाहीर केली आहे. सध्या राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बारावीचे मूल्यमापन सुरू आहे. हे मूल्यमापन तंत्र प्राध्यापकांसाठी डोकेदुखी ठरत असून सरासरी, शेकडा गुण आणि टक्केवारी या गणितातील अवघड संकल्पनांची पुन्हा एकदा प्राध्यापकांना उजळणी करावी लागत आहे.
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलेल्या मूल्यमापन तंत्रामध्ये दहावी, अकरावी व बारावीमधील गुणांना भारांश देण्यात आला आहे. मूल्यमापन तंत्रामध्ये सरासरी, शेकडेवारी व टक्केवारी या गणितामधील कठीण संकल्पनांचा समावेश असल्याने प्राध्यापकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
----------------------
नियमित विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या वर्गांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या तीन विषयांतील गुणांच्या बेरजेला ३ ने भागून त्याची सरासरी १०० गुणांपैकी काढावयाची आहे. या सरासरीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांना ३० टक्के भारांश दिला देण्यात आला आहे. त्याचे रूपांतर २४ पैकी गुणांमध्ये करावयाचे आहे. त्यानंतर अकरावीच्या वर्गामध्ये प्रत्येक विषयाला प्राप्त झालेल्या १०० पैकी गुणांना ३० टक्के भारांश देण्यात आला असून, त्याचे रूपांतर २४ पैकी गुणांमध्ये करावयाचे आहे. तसेच बारावीचे वर्षभरातील प्रथमसत्र, सराव परीक्षा, सराव चाचण्या अथवा तत्सम मूल्यमापनासाठी निर्धारित केलेल्या एकूण गुणांपैकी प्राप्त गुणांना ४० टक्के भारांश देण्यात आला असून त्याचे रूपांतर ३२ पैकी गुणांमध्ये करावयाचे आहे. अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व अंतर्गत मूल्यमापनासाठी २० गुण निश्चित करण्यात आले आहेत. या पद्धतीने नियमित विद्यार्थ्यांसाठी १०० गुण निश्चित करण्यात आले आहेत.
------------------------------
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन तंत्रात बदल करण्यात आला आहे. दहावीच्या वर्गांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्या तीन विषयांतील गुणांच्या बेरजेला ३ ने भागून त्याची सरासरी १०० गुणांपैकी काढावयाची आहे. या सरासरीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांना ५० टक्के भारांश देण्यात आला आहे. तसेच अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी २० गुणांची तरतूद करण्यात आली आहे. शाखानिहाय या गुणांमध्ये बदल होत असल्याचे पाहायला मिळते. यापूर्वीच्या बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेतील गुणांचा तपशील मंडळाला स्वतंत्रपणे कळवायचा आहे. उर्वरित ३० गुण उत्तीर्ण झालेल्या विषयाच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे मंडळाकडून देण्यात येणार आहे. खासगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी व एम.सी.व्ही.सी.च्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मूल्यमापन तंत्र तयार करण्यात आले आहे.