रत्नागिरी : ॲल्युमिनियम (BALCO) कारखान्यांसाठी नजीकच्या शिरगाव येथील सुमारे ८३० शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमीन संपादित करण्यात आल्या. मात्र, १९७० सालापासून त्यावर प्रकल्प न करता या जागा खासगी कंपन्यांना देण्यात आल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून या शेतकऱ्यांना त्यांच्या जागा परत द्याव्यात अथवा त्यांना नवीन दरानुसार त्याचा मोबदला मिळावा, यासाठी आक्रमक झालेल्या नजिकच्या शिरगाव आणि परिसरातील अल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन केले. यात सुमारे १५० शेतकरी सहभागी झाले होते.झाडगाव म्युनिसिपल हद्दीच्या आतील आणिबाहेरील तसेच शिरगाव ग्रामपंचायतीतील काही शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी घेण्यात आल्या. १९७० सालापासून आत्तापर्यंत या जमिनीत कोणताही कारखाना कुठल्याच सरकारने आणला नाही. ही जमीन पडीक अवस्थेत आहे. गेल्या ५३ वर्षात ॲल्युमिनियम प्रकल्प उभारण्यात आला नाही. त्यामुळे हे शेतकरी ५३ वर्षे उत्पन्नापासून वंचित राहिले आहेत. तसेच शेतकऱ्यांना सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणे नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात.
संपादित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना काही कारणास्तव परत करता येत नसतील तर या जागेचा चालू बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा, अशी मागणी ॲल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र, या मागणीची दखल आतापर्यंत सरकारने न घेतल्याने या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा दिवस धरणे आंदोलन केले.यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांंचीही शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना या मागणीचे निवेदनही दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपण हे निवेदन एमआयडीसीकडे वर्ग करू तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही दिली.जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देताना ॲल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकरी संघाचे राजन आयरे, प्रसन्न दामले, चंद्रशेखर नातोंडकर, उमेश खंडकर, सलील डाफळे यादी पदाधिकारी उपस्थित होते.