राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील सौंदळ येथील व्हॉल्ट स्थानकाचे (थांबा) क्रॉसिंग स्थानकात रूपांतर करण्याबाबतचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने देऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्यापही काेणतीच हालचाल न झाल्याने त्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न केला जात आहे. दरम्यान, सौंदळ येथील व्हॉल्ट स्थानकात सार्वजनिक स्वच्छतागृहासह खराब बनलेला रस्ता आणि अन्य समस्या अधिकच बिकट बनत चालल्या आहेत.कोकण रेल्वे मार्गावर सौंदळ येथे थांबा मिळावा, अशी सातत्याने मागणी तालुक्याच्या पूर्व परिसरातून होत होती. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सौंदळ हॉल्टला मान्यता दिली होती. वर्षभरातच सौंदळ व्हॉल्टचे काम मार्गी लागून त्याचे उद्घाटन प्रभूंच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर गेल्या तीन वर्षांत येथे दोन पॅसेंजर थांबत होत्या. कोरोनाच्या काळात दोन्ही पॅसेंजर बंद होत्या. त्यापैकी एक असलेली सावंतवाडी-दिवा ही पॅसेंजर कोरोना संपताच पूर्ववत सुरू झाली.तिला एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला. तथापि, दुसरी पॅसेंजर अद्याप सुरू झालेली नाही. व्हॉल्ट स्थानक असलेल्या सौंदळचे कायमस्वरूपी स्थानकात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी गेली काही वर्षे सातत्याने सुरू आहे. मात्र, ही मागणी अद्यापही कागदावरच राहिली आहे. राजापूर तालुक्यातील बहुसंख्य परिसरासह लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्करा परिसरातील प्रवाशांना सौंदळ येथील व्हॉल्ट स्थानकाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणारा आहे.भविष्यात सौंदळ येथे अद्ययावत स्थानकाची उभारणी झाल्यास तालुक्याच्या पूर्व परिसरातील प्रवाशांना साेयीचे ठरेल. सध्या या स्थानकात स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, स्थानकाकडे जाण्यासाठी चांगला रस्ताही नाही. स्थानकात अन्य सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील सौंदळ ‘व्हॉल्ट स्टेशन’चे आश्वासन हवेतच विरले!; राजापुरातील पूर्व परिसरासाठी उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 7:04 PM