खेड : हळद ही गुणकारी असून तिला खूप मागणी आहे. आपल्या जिल्ह्यात हळदीचे
उत्पन्न चांगले होत असून, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन
आपल्या शेतकरी बांधवांना सहजतेने उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी यामध्ये रुची घ्यावी व हळदीसह अन्य पिकांचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन आमदार योगेश कदम यांनी केले. मी स्वत: खेड, दापोली, मंडणगड तालुक्यात हळद
लागवडीचे तीन प्लॉट तयार करून हळद लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तीनही तालुक्यात जागा पाहण्याचे काम सुरू असून लवकरच तेथे लागवड करु असेही
त्यांनी सांगितले.
खेड, दापोली, मंडणगडच्या कृषी अधिकारी, पर्यवेक्षक यांची बैठक
घेऊन त्यांना सूचना करताना तीन तालुक्यात १०० पेक्षा अधिक कृषी सहायक व पर्यवेक्षक असून त्यांच्यावर ठराविक गावांची जबाबदारी आहे. अशा सर्व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पालन करताना गावागावांना भेटी देऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. तसेच प्रत्येक कृषी पर्यवेक्षकाच्या कामाचा दिवस गावातील शेतकऱ्यांना माहिती असावा व त्याची नोटीस
त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करावी. सरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन
इच्छुक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना आमदार कदम यांनी यावेळी कृषी सहायकांना केल्या.
हळद लागवडीसह इतर पिके घेण्याबाबत तसेच फळझाडे लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करा. हे आपले काम आहे. शेतकऱ्यांना मदत करा त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करा. मतदारसंघात अनेक पाटबंधारे योजना कार्यान्वित आहेत. त्याच्या पाण्याचा वापर करुन भाजीपाला व अन्य उत्पन्न घेण्याबाबत जागृतीवर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. कोरोनामुळे लोकांचे रोजगार संपुष्टात येत आहेत. अनेक बांधव मुंबई, पुणे सारखी शहरे सोडून गावाकडे येत आहेत. शेती हाच आता त्यांच्या समोर पर्याय दिसत आहे. अशा शेतकऱ्यांना मदत करा. ठरलेल्या वेळेत गावात भेटी देऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन द्यावे, अशी सूचना आमदार कदम यांनी केली.