शैक्षणिक साहित्याचे वाटप
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील ध्येयवादी युवा संघटनेतर्फे निवळी गावातील होतकरू नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सचिव दैवत पवार यांनी स्वागत केले. वैभव पवार यांनी मार्गदर्शन केले.
खड्डे बुजविण्याची मागणी
दापोली : दापोली-मंडणगड मुख्य रस्त्यावर खेर्डी गावी झालेल्या रस्त्याच्या दुर्दशेबाबत दापोली राष्ट्रवादी युवती आक्रमक झाल्या असून, याबाबत दापोली बांधकाम खात्याला पत्र देण्यात आले आहे. या मार्गाची तत्काळ दुरुस्ती न झाल्यास राष्ट्रवादी पक्षातर्फे या मार्गावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी
गुहागर : तालुक्यातील सर्व महाई सेवा केंद्र व सेतू कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी केले आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. सेतू कार्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दाखले मिळविण्यात अडचणी येत आहेत.
मोफत आरोग्य शिबिर
चिपळूण : नॅब आय हाॅस्पिटलतर्फे खेड, गुहागर, मंडणगड या तालुक्यांतील ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना डोळ्यांच्या विकारासंदर्भात मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ रोजी चिखली, दि. २० रोजी आंबवली, दि. २२ रोजी कडवई, दि. २७ रोजी खेड येथे हे शिबिर होणार आहे.
डाॅ. अभिषेक नागरगोजे यांची निवड
देवरूख : महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या राज्य सचिवपदी देवरूखचे डाॅ. अभिषेक गुलचंद नागरगोजे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हे, सहा विभागातून डाॅ. नागरगोजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी : गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी बसणी नागझरी येथे सागरी महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ग्रामस्थांनी श्रमदानातून झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. भर पावसात ग्रामस्थ त्यासाठी कार्यरत होते.
नेटवर्क समस्या
गणपतिपुळे : पावसामुळे भारत संचार निगम तसेच खासगी कंपन्यांची मोबाइल सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. नेटवर्कअभावी शासकीय कार्यालये, बॅंका तसेच मुलांना अध्यापनात समस्या निर्माण होत आहे. नेटवर्क विस्कळीत झाल्यानंतर पूर्ववत करण्याकडे कंपन्याचे दुर्लक्ष होत आहे.