राजापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुरूप दैनंदिन कामकाजातील अनियमिततेचा ठपका ठेऊन प्रांताधिकारी प्रवीण खाडे यांची राजापूरच्या उपविभागीय अधिकारी पदावरून उचलबांगडी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
खाडे यांच्या वादग्रस्त कार्यालयीन वर्तनाने प्रशासनाचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे पार पडू शकत नाही, यास्तव त्यांची अन्यत्र बदली करण्यात यावी व त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जावी, याकरिता कोकण विभागाचे महसूल उपायुक्त मकरंद देशमुख यांनी अपर मुख्य सचिवांना २७ जानेवारी रोजीच्या पत्राने कळवले आहे.प्रांताधिकारी प्रवीण खाडे हे एक मार्च २०१९ पासून उपविभागीय अधिकारी राजापूर या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याविरूध्द त्यांचे अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्या लेखी तक्रारी जिल्हाधिकारीरत्नागिरी यांच्या कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत. त्याचा हवाला देत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी अपर मुख्य सचिव यांना सादर केलेल्या पत्रात नमूद केले आहे.या बाबींच्या अनुषंगाने भविष्यात कार्यालयीन तसेच अन्य विभागाशी संबंधित दैनंदिन प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पडू शकत नाही. तसेच अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये कायम तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने प्रवीण खाडे यांची प्रशासकीय कारणास्तव अन्य ठिकाणी बदली करून या पदावर सक्षम उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविण्यात आल्याचे तसेच प्रवीण खाडे यांच्याविरूध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याकामी जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे.ही आहेत कारणेवरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, वरिष्ठांचे फोन न उचलणे, अधिनस्त कर्मचारी यांच्याशी पूर्वग्रहदूषित ठेवून काम करण्याची प्रवृत्ती, कार्यालयीन तपासणीच्या वेळी अभिलेख उपलब्ध करून न देणे, असा ठपका प्रवीण खाडे यांच्यावर ठेवला आहे. त्यासाठी बदली आणि शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.