देवरुख : देवरुख नगरपंचायतीने चर्मालय स्मशानभूमीत स्ट्रीटलाइट उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या स्मशानभूमीत विजेची व्यवस्था नसल्याने प्रभाग क्रमांक ८,९ आणि १० मधील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. युवासेनेचे उपशहरप्रमुख तेजस भाटकर यांनी या समस्येचा पाठपुरावा केल्याने अखेर स्ट्रीटलाइटचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
सर्वेक्षणाची मागणी
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची मोठ्या प्रमाणावर झळ बसू लागली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने अशा ग्रामीण भागातील गावांचे सर्वेक्षण करून तिथल्या ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अनेक गावांकडून करण्यात येत आहे. मात्र, अजूनही पंचायत समितीकडून दखल घेण्यात आलेली नाही.
शाळेला देणगी
मंडणगड : तिडे निमदेवाडी येथील मुंबईस्थित संजय निमदे यांनी येथील शाळेला शैक्षणक, तसेच खेळाच्या साहित्याची देणगी दिली आहे. त्यांचे आई- वडील राजश्री पांडुरंग निमदे यांच्या हस्ते रोख तीन हजार रुपयांची देणगी मुख्याध्यापक आनंद सुतार, उपशिक्षक ज्ञानदेव कराड यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली.
सुरक्षा रक्षकांची उपासमार
रत्नागिरी : समुद्रकिनारपट्टी परिसरात अहोरात्र कार्यरत असलेले सुरक्षारक्षक यांचे अद्याप मानधन मिळालेले नाही. अहोरात्र जागता पहारा ठेवणाऱ्या या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधनच न दिल्याने त्यांची उपासमार होत आहे. हे मानधन एकत्रित देण्यात यावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पाणीकपात
रत्नागिरी : काजळी नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हरचेरी येथील धरणामधील साठाही कमी झाला आहे. पाऊस सुरू होण्यासाठी अजूनही २० ते २५ दिवसांचा कालावधी असल्याने एम.आय.डी.सी.ने १५ मेपासून २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाचे आगमन अनिश्चित असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.