रत्नागिरी : ऐतिहासिक ठेवा असलेली कातळशिल्प पर्यटकांना भुरळ घालीत आहेत. या कातळशिल्पांचे जतन होऊन भावी पिढीला ती पाहता यावीत याकरिता जिल्ह्यातील दहा कातळचित्रे राज्य संरक्षित करण्याचा प्रस्ताव पुरातत्व विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, वर्षभर हा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे.जिल्ह्यातील ही कातळशिल्प पाहण्यासाठी स्वीडन, अमेरिका, आॅस्ट्रेलिया, युके, फ्रान्स येथून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. शिल्पे अतिप्राचीन असल्याने त्यामध्ये मानवी संस्कृतीच्या इतिहासाची माहिती मिळू शकते. कातळावर चिरेखाणींचे खोदकाम, रस्ता करत असताना शिल्पे नष्ट होऊ नयेत यासाठी कातळशिल्पे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावीत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुरातत्व विभागामार्फत कातळशिल्प राज्य संरक्षित करण्यासाठीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.उक्षी, देवीहसोळ (राजापूर), बारसू येथील दोन (राजापूर), कशेळी (राजापूर), चवेदेवूड (रत्नागिरी), राम रोड (रत्नागिरी), उमरे (रत्नागिरी) या कातळशिल्पांचे प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आले आहेत. तर निवळी गावडेवाडी, उमरे ,कापडगाव, जांभरूण (रत्नागिरी), पोचरी, मेर्वी, देवाचेगोठणे, सोलगाव, सोगमवाडी येथील कातळशिल्पांचे प्रस्ताव पुरातत्व विभागाच्या कार्यालयामार्फत वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आले आहेत.
दहा कातळशिल्पांचे प्रस्ताव पाठविण्यात आले असताना वर्षभरात प्राथमिक अधिसूचनाही काढण्यात आलेली नाही.