लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षकांनी बांधकाम विभागासह सर्व संबंधितांकडे तक्रार करूनही मंडणगड वेळास मार्गावरील गणेशकोंड - उमरोली दरम्यानची संरक्षक भिंत आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. दोन वाहने जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर दरीच्या बाजूने मोरीस लागून असलेली संरक्षक भिंत पडल्याने धोकादायक झाली आहे.
यासंदर्भात बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उत्तम पिठे यांनी मोरीच्या व संरक्षक भिंतीच्या बाजूस दगडी भरावाची मागणी केली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या अत्यंत महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने पावसात रस्त्यावर उद्भवलेल्या नव्या परिस्थितीमुळे गंभीर अपघात होऊ शकतो. दुर्दैवाने अशी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी ठेकेदार व संंबंधितांवर राहणार आहे. पावसाने येथील रस्त्याचे संरक्षक भिंतीअभावी नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधितांनी याकडे वेळेवर लक्ष देण्य़ाची मागणी पोलीस निरीक्षकांनी वारंवार केली आहे. असे असताना संबंधितांनी केलेले दुर्लक्ष अक्षम्य असल्याचे बोलले जात आहे.