चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर कळबंस्ते बौद्धवाडी येथे चौपदरीकरणात संरक्षक भिंत उभारून महामार्गासाठी भराव करण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसात येथील संरक्षक भिंत कोसळली आहे. परिणामी रस्त्यासाठी केलेला भरावही खाली आला आहे. यावरून महामार्गातील उत्कृष्ट कामाचा नमुना समोर आला असल्याचे मत माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकत
मुकादम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. यामध्ये कळंबस्ते बौद्धवाडी येथील रेल्वेपुलापासून कळबंस्ते धामणंद फाट्यापर्यंत भराव करण्यात आला आहे. रस्ता उंच करावा लागल्याने
काही ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. संरक्षक भिंती उभारून तिथे मातीचा भराव
करण्यात आला होता. दरम्यान, गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसात कळबंस्ते बौद्धवाडी
येथील संरक्षक भिंत काेसळली आहे. दरम्यान भिंतच कोसळल्याने रस्त्यासाठी केलेला भराव काही
प्रमाणात खाली आला आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी सभापती शौकत मुकादम, सरपंच
विकास गमरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठेकेदार कंपनीचे अधिकारीही घटनास्थळी आले होते.