खेड : तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात भडगाव ते भरणे - बाईतवाडी ते बौद्धवाडी येथे शासनाच्या विशेष घटक योजनेतील मागासवर्गीय निधीचा गैरवापर करणाऱ्या दोषींवर प्रशासनाला कारवाई करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत रिपाइंने अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत कार्यवाही न झाल्यास आंदाेलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
रिपाइंचे कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांनी प्रशासनाला याबाबत समाजकल्याण उपायुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी व रिपाइंच्या शिष्टमंडळासमवेत बैठकीत चौकशी समिती नेमण्याचे पुन्हा आश्वासन दिले हाेते. त्यानंतर काही दिवसापूर्वीच निधी गैरवापर प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांनी समिती नेमली आहे. या समितीमार्फत चौकशी प्रक्रियाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइंचे कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने नूतन उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान दोषींवर कारवाई करण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी दादा मर्चंडे, शंकर तांबे, सुरेंद्र तांबे, मिलिंद तांबे, विकास धुत्रे, गणेश शिर्के, दीपेंद्र जाधव, गोपीनाथ जाधव, बाळकृष्ण देवळेकर, गौतम तांबे, जितेंद्र तांबे, प्रशांत कासारे, प्रकाश जाधव, सखाराम सकपाळ आदी उपस्थित होते.