चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे होत असलेले चौपदरीकरण पूर्णत्वास गेलेले नसल्याने नागरिकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नासंदर्भात मंगळवारी कोकण समन्वय समितीच्या वतीने निषेध करत मोर्चा काढण्यात आला. शहरातील बहादूरशेख नाका येथून प्रारंभ झालेल्या या मोर्चादरम्यान काळे झेंडे घेऊन हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. या वेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने व निकृष्ट दर्जाचे होत असून पावसाळ्यात महामार्ग खड्डेमुक्त व्हावा, धोकादायक वळणे व घाटमार्ग शक्य तितके सोपे करावेत, महामार्गाच्या भरावासाठी डोंगर पोखरू नये, महामार्गाचे जंक्शन मुख्य रस्त्यावर येऊन मिळत असल्याने अशा ठिकाणी सुरक्षिततेसाठी पूल, भुयारी मार्गाची व्यवस्था हवी, लोटे-परशुराम, पोलादपूर, संगमेश्वर येथील बाजारपेठेचा प्रश्न सोडवावा, सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य असतील ते सर्व बदल केले जावेत व याकरिता एक समिती बनवून संपूर्ण महामार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, आदी मागण्या केल्या आहेत.
या वेळी श्रीपाद चव्हाण, शिरीष काटकर, मिलिंद कापडी, राम रेडीज, संजय तांबडे, तुषार गोखले, प्रसाद सागवेकर, रूपेश घाग, प्रवीण पाकळे, अजय महाडिक, शरद शिगवण, जगदीश वाघुळदे, अमोल शिरधनकर, निखिल पाटील, सुधीर भोसले, बुवा चव्हाण, निर्मला जाधव, वैशाली विचारे, प्राजक्ता सरफरे आदी उपस्थित होते.