चिपळूण : महापुरानंतर एक महिना उलटून गेला, तरी अद्याप पूरग्रस्त नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची अवहेलना करू नका. तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्या, अशी मागणी चिपळूण राष्ट्रवादीतर्फे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने यावेळी लेखी निवेदन देखील सादर केले. २२ जुलै रोजी आलेल्या महापुराने चिपळूणमध्ये अतोनात नुकसान केले. तब्बल ११ हजार ८०५ जण या महापुरामुळे बाधित झाले असून घर, दुकाने अशा सर्वच वस्तूंचे नुकसान झाले आहे. त्यावेळी अनेकांनी दौरे करून नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पूरग्रस्तांनी महसूल कार्यालयाकडे सादरदेखील केली आहेत; परंतु एक महिना उलटला तरी अद्याप नुकसानभरपाईचा थांगपत्ता नसल्याने चिपळूण राष्ट्रवादीने दखल घेत तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांची भेट घेतली.
यावेळी माजी सभापती शौकत मुकादम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, सतीश खेडेकर, खालिद पटाईत, अरुण भोजने, सचिन साडविलकर, मुश्ताक मुकादम उपस्थित होते. जयराज सूर्यवंशी यांची भेट घेऊन या शिष्टमंडळाने आता जास्त प्रतीक्षा नको. प्रशासनाने तातडीने पावले उचलून पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.