गुहागर : अंजनवेल ब्राम्हणवाडी येथील प्रदूषित घरांना तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा. त्याचबराेबर येथील प्रदूषित झरे आणि विहिरी यांच्या पाणी नमुन्यांची जिल्हा आराेग्य प्रयाेगशाळेत अधिक तपासणी करून त्याचा अहवाल सादर करा, असे लेखी आदेश चिपळूण येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरजीपीपीएल कंपनीच्या प्रशासनाला दिले आहेत.
अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक झरे आणि विहिरी कंपनीमुळे दूषित झाल्याने येथील ग्रामस्थांनी २९ मार्चला लेखी तक्रार आरजीपीपीएलकडे केली हाेती. प्रदूषित नियंत्रण मंडळाने याची दखल घेत पाणी नमुने तपासणी अहवाल अंजनवेल ग्रामपंचायतीला पाठवले. याबाबत पुढील कारवाई म्हणून कंपनीला प्रदूषित भागाला पाणी पुरवठा आणि पाणी नमुन्यांची अधिक तपासणी करण्याबाबत आदेश दिले.
कंपनीच्या असहकार्यामुळे व वेळकाढू धाेरणामुळे ब्राह्मणवाडी येथील ग्रामस्थांनी अंजनवेल ग्रामपंचायतीमार्फत पाणी नमुन्यांची पुणे येथील पाणी व अन्न तपासणी संस्थेकडून याेग्य रितीने तपासणी करून घेतली. या अहवालात येथील विषारी व झऱ्याचे पाणी प्रदूषित झाल्याचे सिद्ध झाले. या अहवालाचा संदर्भ घेऊन ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कंपनीकडे एकत्रित बैठकीची मागणी केली आहे. त्याचबराेबर प्रदूषणग्रस्त भागाला तातडीने पाणी पुरवठा करावा, अशी लेखी मागणी केली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशामुळे या विषयाला आता चालना मिळाली असून, अंजनवेल पाणी प्रदूषण प्रश्नी आता शासनाने हस्तक्षेप करून कंपनी प्रशासनाला पाणी प्रदूषण राेखणे आणि प्रदूषित भागाला पाणी पुरवठा करणे, याबाबत आदेश द्यावेत, त्याचबराेबर पाणी प्रदूषणाबाबत आरजीपीपीएल कंपनीची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.