राजापूर : भाजप नेते संतोष गांगण यांच्या मागणीनुसार रायपाटण ग्रामीण रूग्णालयात डेडिकेटेड काेविड हेल्थ सेंटर सुरू करताना नवीन वास्तूत कोविड सेंटर तर आता अस्तिवात असलेल्या ओपीडीच्या ठिकाणी नियमित रूग्णालय सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन्ही वास्तूंमध्ये सुरक्षित तटबंदी अशी रचना करण्यात आली असून, कोविड आणि नॉन-कोविड रूग्णांसाठी दोन वेगळी प्रवेशद्वारे असणार आहेत.
रायपाटण ग्रामीण रूग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करताना नियमित रूग्णालय सेवा व लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याची संतोष गांगण यांची आग्रही भूमिका होती. त्यासाठी स्थानिक आमदार राजन साळवी, जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्याशी चर्चा तसेच संबंधित विभागाशी व मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार सुरू होता. त्याला यश येताच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सोबतच रूग्णालय सेवा सुरु ठेवण्याचे निश्चित झाले आहे. डीसीएचसी उभारणी व ग्रामीण रूग्णालय व्यवस्थापन यांचे नियोजन करण्यासाठी आमदार साळवी यांनी रायपाटण रूग्णालयाला भेट दिली.
यावेळी संतोष गांगण, तहसीलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील, वैद्यकीय अधिकारी डाॅ. निखील परांजपे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकामचे अधिकारी, मंडल अधिकारी राईन, तलाठी प्रसन्न गुरव, रायपाटणचे सरपंच भोला गांगण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी रायपाटण ग्रामीण रूग्णालयाच्या नवीन वास्तूत कोविड सेंटर तर आता अस्तिवात असलेल्या ओपीडीच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालयाच्या नियमित सेवा तसेच दोन्ही वास्तूंमध्ये सुरक्षित तटबंदी अशी रचना करण्यात आली असून, कोविड आणि नॉन-कोविड रूग्णांसाठी दोन वेगळी प्रवेशद्वारे ठेवण्यात येणार आहेत.
-----------------------------
जिजामाता विद्यामंदिरात लसीकरण केंद्र
जिजामाता विद्यामंदिर येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार आहे, त्याची व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. नियोजित डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दहा ऑक्सिजन बेडसह ३० बेडची सुसज्ज व्यवस्था करण्यात येत आहे. रायपाटण ग्रामीण रूग्णालयांतर्गत लसीकरण व नियमित रूग्णालय सेवा सुरु राहणार असल्याने राजापूर पूर्व विभागातील जनतेला सोईस्कर होणार आहे.