अडरे : चिपळूण तालुक्यातील कामथे प्रयोगशाळेत तपासलेल्या पाण्याच्या ३९५ नमुन्यांपैकी ३० नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये १४ सार्वजनिक विहिरींचे पाणी सर्वांत जास्त दूषित असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिन्याला प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांचे नमुने तपासले जातात. आॅगस्ट महिन्यात चिपळूण तालुक्यातील ३९५ नमुने घेऊन कामथे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये ३० ठिकाणांचे पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायतीचे जलसुरक्षक कर्मचारी हे पाणी पुरवठा करणाऱ्या साधनांमधून पाण्याचे नमुने गोळा करतात. यामध्ये सार्वजनिक विहिरी, तलाव, बोअरवेल, पाण्याची टाकी, नळपाणी पुरवठा करणारे नळ याचा समावेश असतो. आॅगस्ट महिन्यात झालेल्या तपासणीत कमी पाण्याचे नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात. त्यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पाणी शुद्धिकरणावर भर दिला जातो. तालुक्यातील कोणत्या गावामध्ये पाणी पिण्यास योग्य किंवा अयोग्य आहे, हे या तपासणीनंतर समजून येते. ज्या गावात पिण्याच्या पाण्याचे दूषित स्रोत सर्वांत जास्त आढळून येतात, त्या ग्रामपंचायतीला आरोग्य विभागाकडून पाण्याच्या दुबार तपासणीसाठी वारंवार सूचना केली जाते. चिपळूण तालुक्यातील रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कळमुंडी गावातील लांजेकरवाडी, घडशीवाडी सार्वजनिक विहिरींचे दोन नमुने दूषित असल्याचे दिसून आले. कापरे आरोग्य केंद्राअंतर्गत बिवली गावातील गवळवाडी, भोम शिर्केवाडी, भोम खालचीवाडी, कालुस्ते बुद्रुक नारायणवाडी अशा ४ सार्वजनिक विहिरींचे पाणी दूषित आहे. खरवते अंतर्गत रावळगाव सुर्वेवाडी, रावळगाव सुर्वेवाडी, पाचाड बुरुडवाडी, पाचाड बुरुडवाडी अशा ४ नळपाणी पुरवठा योजनांचे पाणी दूषित आहे.अडरे अंतर्गत अनारी हनुमानवाडी, वालोपे - भोजवाडी, वालोपे - बौद्धवाडी, पेढे - कोष्टेवाडी अशा ३ सार्वजनिक विहिरी व एका नळपाणी पुरवठा योजनेचे पाणी दूषित आहे. दादर - पेढांबे बौद्धवाडी, पेढांबेफाटा, मावळतवाडी, तिवरे कातकरवाडी अशा ४ सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनांचे पाणी दूषित आहे. शिरगाव मडगवाडी हातपंप, वरचीवाडी, मुंढे टेपवाडी, कुंभार्ली मोहल्ला, फुरुस हडकणी सतीचीवाडी १, सावर्डे अंतर्गत असुर्डे बौद्धवाडी, खेतलेवाडी, पालवण कोष्टेवाडी, कोंडमळा कातळवाडी असे ४ नमुने दूषित आहेत. वहाळअंतर्गत तोंडली वेसवी टाकी, पिलवलीतर्फे सावर्डे भागडे सार्वजनिक विहीर, पिलवलीतर्फे सावर्डे आगे्रे टाकी असे एकूण ३ नमुने दूषित आहेत. (वार्ताहर)
सार्वजनिक विहिरी सर्वाधिक दूषित असल्याचे सिध्द
By admin | Published: September 01, 2014 9:52 PM