लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : श्यामची आई स्मृती शताब्दी वर्षानिमित्त व साने गुरूजींच्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्वयंसेतू’ संस्थेतर्फे जिल्ह्यातील सर्व बालगृहांतील मुलांना खेळणी व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी शहरातील बालगृहात यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘खरा तो एकचि धर्म’ या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. अवनी आठवले या विद्यार्थिनीने गुरू-शिष्यांच्या नात्यावर आधारित कथा सादर केली. सविता बर्वे यांनी ‘बलसागर भारत होवो’ तर ऋतिक मोरे यांनी ‘आता उठवू सारे रान’ हे गीत सादर केले. सविता बर्वे यांनी श्यामच्या आईचे संस्कारांबाबत मुलांना माहिती दिली, तर श्रध्दा कळंबटे यांनी चालू घडामोडींविषयी मुलांशी संवाद साधला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास अधिकारी आर. आर. कांगणे उपस्थित होत्या. यावेळी कांगणे म्हणाल्या की, प्रतिकूल परिस्थितीमुळे तुम्ही या संस्थेत आला आहात. त्यामुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करा. भविष्यात सुशिक्षित, सुजाण व स्वावलंबी नागरिक बनावे, यासाठी शासन, संस्था, सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करीत असतात. ‘स्वयंसेतू’च्या कार्याबद्दल कांगणे यांनी समाधान व्यक्त करून मुलांना बैठ्या खेळाचे संच व गोष्टीची पुस्तके वितरित केली. यावेळी श्रध्दा कळंबटे, दीपाली सावंत, अवनी आठवले, व्ही. एस. पोवार, बालगृह अधीक्षक व्ही. व्ही. मोर्ये उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. माणिक बाबर, मनोज खानविलकर, मुग्धा कुळ्ये, माधवी अंकलगे यांचे सहकार्य लाभले. निरीक्षणगृह शिक्षक व्ही. एस. पोवार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
बालगृहातील मुलांना खेळणी, पुस्तक
By admin | Published: June 21, 2017 1:07 AM