रत्नागिरी : तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रात नळपाणी जोडणीला पंप बसवून पाणी वेगात खेचणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे तसेच मीटरच्या आधी असलेल्या जलवाहिनीला टॅब जोडून फुकट पाणी वापरणे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतीने याची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीच्या पथकातर्फे अशा जोडणीधारकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांना २५ हजार रुपये दंड आकारला जाणार असून, पाणीपंपही जप्त केले जाणार आहेत.कुवारबाव ग्रामपंचायतीची स्वत:ची नळपाणी योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात कुवारबावमध्ये गृहसंकुलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पाणीजोडण्याही वाढल्या आहेत. त्या तुलनेत एमआयडीसीकडून या नळपाणी योजनेला अधिक पाण्याचा पुरवठा होत नाही. मात्र, गेल्या दोन - तीन वर्षांच्या काळात नळयोजनेच्या पाण्याची चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत.
काहीजण नळजोडणीला पंप जोडून अतिरिक्त प्रमाणात पाणी खेचत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेजारील नळजोडणी धारकांना अल्प प्रमाणात किंवा कमी दाबाने पाणी मिळणे, ही समस्या निर्माण झाली आहे.याबाबत ग्रामपंचायतीकडे काही तक्रारी आल्याने २५ एप्रिल २०१८च्या ग्रामपंचायत सभेत या समस्येवर मात करण्यासाठी १५/१ नंबरने ठराव करण्यात आला आहे. नळजोडणीला पंप बसविणे, पाणी मोजणी मीटर काढून टाकणे किंवा मीटरच्या पाठीमागून अनधिकृतपणे पाणी भरणे, असे प्रकार आढळून आल्यास संबंधित नळजोडणी धारकाला २५ हजार रुपये दंड केला जाणार आहे.
तसेच पाणीपंपही जप्त केला जाईल. संबंधित घर नंबरची नळजोडणी कायमस्वरुपी बंद करण्यात येईल, असे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. याबाबतची सूचना सर्व नळजोडणीधारकांना लेखी स्वरुपात देण्यात आली आहे.धडक मोहिमेची गरजकुवारबाव ग्रामपंचायत क्षेत्रातील नळपाणी योजनेच्या पाण्याचा गैरवापर, पाणीचोरी याला आळा घालण्यासाठी नळयोजनेच्या ज्या भागात पाणी सोडण्यात येते, त्याचवेळी संबंधित विभागातील नळजोडण्यांची पाहणी, तपासणी करण्याची धडक मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. यासाठी ग्रामपंचायत आता पथकाची नियुक्ती करणार की, ही मोहीम कागदावरच राहणार, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.