लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : महापुरामुळे येथे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत १९,३०० पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अजूनही काही दिवस हे काम सुरू राहणार आहे. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात पोहाेचण्याची शक्यता आहे.
चिपळूणच्या इतिहासात महापुराने प्रथमच ७.५० मीटरपर्यंत उंची गाठली. या महापुरामुळे शहरातील ९० टक्के भाग बाधित झाला आहे. यामध्ये बाजारपेठेचे अतोनात नुकसान झाले आहे. अजूनही बाजारपेठेत साफसफाई व गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय दुकानातील मालासोबत मालाच्या पावत्या व अन्य कागदपत्रे वाहून गेल्याने नेमके नुकसान किती झाले याचा अंदाज घेताना कठीण जात आहे. तरीही प्राथमिक अंदाज घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी शहरात प्रभागनिहाय पथक नेमण्यात आले आहेत. या पथकांमध्ये परिसराची माहिती असलेले नगर परिषद वसुली अधिकारी व पंचनाम्यासाठी पाच तलाठी प्रभागनिहाय देण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून एकाचवेळी संपूर्ण शहरात पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.
-------------------------
पंचनामे पूर्ण : १९,३०१
घरे : ९,३६७
पूर्णत: घरे : ८,३२५
अंशत: घरे : ९०८
गाेठे : २१९
दुकाने : ४,२९२
वाहने : ४,७९६
सार्वजनिक मालमत्ता : २७४