महिलेशी अतिप्रसंग करणाऱ्याला १०० तासांत शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 03:35 AM2019-12-09T03:35:15+5:302019-12-09T06:06:36+5:30
न्यायालयाचा जलद निकाल
रत्नागिरी : पोलिसांनी केलेल्या तत्काळ कारवाईमुळे जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी गिरीश इटकळकर यांनी जलद निकाल देत महिलेशी अतिप्रसंग करू पाहणाºया आरोपीला गुन्हा घडल्यापासून अवघ्या १०० तासांत शिक्षा ठोठावली आहे. प्रथमेश बाबूराव नागले (२३, रा. पिरंदवणे, ता. रत्नागिरी) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी प्रथमेश याने २ डिसेंबरला पीडित महिला दुचाकीने परटवणे येथून गणपतीपुळे येथे घरी जात असताना तिचा पाठलाग केला. तिच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी लावत तिला अडवले. तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. महिलेला स्वत:च्या दुचाकीवर बसण्यास जबरदस्ती केली. महिलेने आरडाओरड करताच आरोपी पळाला.
पीडित महिलेने ३ डिसेंबरला रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल एस्. के. बेर्डे यांनी अवघ्या एका दिवसात पूर्ण करून ४ डिसेंबरला दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी महिलेच्या पुराव्याला पुष्टी देणाºया दोन साक्षीदारांचा पुरावा आणि तपासिक अंमलदार यांनी नोंदवलेला घटनास्थळाचा पंचनामा, नकाशा, आरोपीचा जप्त केलेला मोबाईल याआधारे आरोपीचा ठावठिकाणा, त्याने केलेल्या गुन्हा कृत्य सिद्ध होतो, असा निर्णय मुख्य न्यायदंडाधिकारी गिरीश इटकळकर यांनी दिला. विशेष म्हणजे गुन्हा नोंद झाल्यापासून अवघ्या पाचव्या दिवशी त्याचा निर्णय होऊन आरोपीला शिक्षा देण्यात आली.
दोन वर्ष सश्रम कारावास
आरोपीला दोन वर्ष सश्रम कारावास आणि एकूण दंड २० हजार रूपये तसेच दंडाच्या वसूल होणाºया रकमेतून १५ हजार रूपये फिर्यादी महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.